भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 35 धावपटूंचा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग


35 runners from Bhusawal Sports and Runners Association participated in the Mumbai Marathon. भुसावळ (30 जानेवारी 2026) : आशिया खंडातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 स्पर्धा नुकतीच मुंबई येथे उत्साहात पार पडली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या वतीने भुसावळ येथील एकूण 35 धावपटूंनी विविध गटांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.

मुंबईच्या रस्त्यांवर धावले भुसावळचे धावपटू
पूर्ण मॅरेथॉन (42.195 किमी), अर्ध मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी व 5.9 किमी या अंतरांच्या गटांमध्ये सहभागी झाले होते. सकाळी पहाटेपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर हजारो धावपटूंनी धाव घेतली. भुसावळच्या धावपटूंनीही उत्तम तयारी, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शर्यती पूर्ण करत शहराचे नाव उज्ज्वल केले. या गटामध्ये अनुभवी धावपटूंसह नवोदित धावपटूंचाही समावेश होता. अनेक धावपटूंनी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत स्वतःची कामगिरी उंचावली. दीर्घकाळ केलेला सराव, नियमित मार्गदर्शन आणि संघभावना यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे धावपटूंनी सांगितले.

आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळा : प्रा.फालक
संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक यांनी सर्व सहभागी धावपटूंचे अभिनंदन करत ही कामगिरी भुसावळमधील वाढत्या धाव संस्कृतीचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात अधिकाधिक युवक-युवतींनी धावण्याकडे व आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मॅरेथॉन अविस्मरणीय
अर्ध मॅरेथॉन माहिमच्या रेती बंदर क्रीडांगणापासून तर इतर सर्व स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापासून पहाटे पाच वाजता सुरू झाल्या. यावर्षी 69 हजार 702 भारतीय व 363 परदेशी असे एकूण तब्बल 70 हजार 65 धावपटू धावण्याच्या महाकुंभात सहभागी झाले होते. यात प्रत्यक्ष मुंबईच्या रस्त्यांवर 65 हजार 424 तर आपापल्या शहरातून व्हर्चुअल पद्धतीने चार हजार 641 धावपटूंनी सहभाग नोंदविला. त्यात भुसावळचे 7 धावपटू देखील होते. शिवाय 51 हजार 203 पुरुष धावपटूंना 18 हजार 862 महिला धावपटूंनी या स्पर्धेत कडवे आव्हान दिले. वरळी सी लिंकचे विहंगम दृश्य, यावेळी प्रथमच कोस्टल रोडवरून धावतांना प्रचंड चढ उतारामुळे अरबी समुद्राच्या साक्षीने धावपटूंची झालेली पंचाईत, पेडर रोडवरील चढतीच्या रस्त्यावर आजूबाजूला मुंबईकर नागरिकांनी वाढविलेला उत्साह, पोलीस विभाग व स्वयंसेवकांनी ठेवलेले योग्य नियोजन, आयोजकांतर्फे मॅरेथॉनच्या प्रत्येक बारीकसारीक पैलूवर केलेले योग्य नियोजन, सुंदर पदक,पौष्टीक नाश्ता, ठिकठिकाणी असलेले ढोल तसेच बॅण्ड पथके, मैदानावरील कडक बंदोबस्त, धावतांना राजकीय-सामाजिक तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत धावत असल्याचा आनंद व त्यासोबतच धावपटू व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्साह या सर्वच बाबींमुळे ही मॅरेथॉन अविस्मरणीय झाल्याची भावना प्रत्येक धावपटू व्यक्त करत होता. भुसावळच्या धावपटूंच्या सहभागामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून, स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

यांचा स्पर्धेत सहभाग
42 किमी : प्रदीप सोलंकी, राजेंद्र घाटे, जितेंद्र चौधरी, सुरेश सहानी, संतोष मोटवानी, निलेश पाटील, विलास पाटील, संदीप कुमार

21 किमी : डॉ.चारुलता पाटील, माधुरी चौधरी, अर्चना चौधरी, विनिता शुक्ला, माया पवार, ज्योती सिंग, मंगला पाटील, स्वाती फालक, दीपा स्वामी, किर्ती मोटळकर, एकता भगत, गरिमा न्याती, गणसिंग पाटील, मंगेश चंदन, रमेशसिंग पाटील, सारंग चौधरी, मधुकर इंगळे, प्रवीण पाटील

10 किमी : लवली पवार

5.9 किमी : पंकज सिंग

व्हर्चुअल 21 किमी : डॉ.नीलिमा नेहेते, डॉ वर्षा वाडिले, सायली बेंडाळे, सीमा पाटील, राजेंद्र ठाकूर, ममता ठाकूर, सुनीता रंजनसिंग.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !