सारे जुळून आल्यास उद्याच नूतन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी : छगन भुजबळ
If everything falls into place, the new Deputy Chief Minister’s swearing-in ceremony will be held tomorrow: Chhagan Bhujbal मुंबई (30 जानेवारी 2026) राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होत असून त्यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी होत आहे. उद्या शनिवारी आमदाराची बैठक बोलावली आहे. सारे जुळून आल्यास, तर उद्याच शपथविधी होईल, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
काय म्हणाले भुजबळ ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी बैठक होणार असून त्यात विधिमंडळ पक्षनेतेपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच अजित पवारांची खाती आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली.
धार्मिक विधी होताच निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच उपमुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सुनेत्रा पवार यांची निवड अजित पवारांच्या पदावर करण्यात यावी. त्यानुसार राजकीय वर्तुळात हालचाली देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तटकरे यांनीही पत्रकारांशी संवाद साधला असून, उपमुख्यमंत्री पदाबाबत धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्याच्या बैठकीत निर्णय छगन भुजबळ
यासंदर्भात छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार गेले आणि ज्या पद्धतीने गेले आहेत, त्यामुळे झोप उडाल्यासारखी झाली आहे. पण आता असे आहे की शेवटी ’शो मस्ट गो ऑन’ असे म्हणतात, त्यामुळे कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवले पाहिजे, पक्ष असेल सरकार असेल. उद्या मला असे वाटते की, जे विधानमंडळातले जे नेते आहेत आमचे, त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पक्षाचे प्रमुख पद जे अजितदादांकडे होते, ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत मला फारसे माहित नाही, असेही भुजबळ म्हणाले.
