भुसावळातील पद्मावती नगरात 19 ते 21 दरम्यान बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा सोहळा
तीन दिवस रात्री रंगणार कीर्तन : अखेरच्या दिवशी महाप्रसाद
भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावती नगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा सोहळा 19 ते 21 फेब्रुवारी असे तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे. यात तिन्ही दिवस रात्री किर्तन होईल. गेल्या चार दिवसांपासून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
19 ते 21 दरम्यान विविध कार्यक्रम
मंदिराची रंगरंगोटी व सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पद्मावती नगरात पांडुरंग ओंकार पाटील व अलका पांडुरंग पाटील या दाम्पत्याने स्वखर्चाने कुलस्वामिनी बिजासनी मातेचे मंदिर उभारले आहे. मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम 19 ते 21 फेब्रुवारी असे तीन दिवस होणार आहे. त्यात 19 रोजी रात्री 8 वाजता गोपाळ महाराज यांचे हरिकिर्तन होईल. ‘परमार्थ आणि समाजाची वास्तव स्थिती’ असे विषय घेऊन ते मांडणी करतील.

20 रोजी सकाळी बिजासनी मातेच्या मूर्तीची पद्मावतीनगर परिसरातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर होमपूजा आणि धार्मिक विधी होईल. रात्री 8 वाजता महिला किर्तनकार राधाताई भोलाणकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 रोजी सकाळी 7 वाजेपासून अभिषेक पूजा, मूर्तीची स्थापना केली जाईल. दुपारी महाप्रासादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्री 8 वाजता राजेंद्र महाराज यांचे किर्तन होईल. त्यांना गायनाचार्य रामकृष्ण महाराज, मृदंगाचार्य हर्षल महाराज हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पांडुरंग पाटील, अलका पाटील, पवन पाटील यांच्यासह आयोजकांनी केले आहे.






