भुसावळात नुपूर महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध
भुसावळ (16 फेब्रुवारी 2026) : शहरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नुपूर महोत्सव या शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन रविवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता डॉ.बी व्ही खाचणे हॉल, नंदनवन कॉलनीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे संचालक सुभाष पाटील, शांती विद्यामंदिर फैजपूरच्या अध्यक्षा शुभांगी महाजन सुप्रसिद्ध राष्ट्रीय नृत्यकार श्री रामा कौंडिण्य (आंध्र प्रदेश), नुपूरचे संचालक रमाकांत भालेराव, अॅकॅडमीच्या नृत्य शिक्षिका चारू भालेराव यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक करताना संचालक रमाकांत भालेराव यांनी अकॅडमीचे विविध उपक्रम आणि सदर महोत्सवाची माहिती दिली.

विविध नृत्यांचे सादरीकरण
भालेराव यांनी शास्त्रीय नृत्याला योग्य ती मान्यता मिळून त्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. या महोत्सवात आतापर्यंत कथक भरत नाट्यम कुचीपुडी मोहिनीअट्टम ओडिसी मणीपुरी कथकली अशा अनेक शास्त्रीय नृत्यांचे प्रदर्शन आजपर्यंत झाले आहे यावर्षी झालेल्या महोत्सवात वैशिष्ट्य म्हणजे आंध्रप्रदेशातील रामा कांडिन्य यांनी कुचीपुडी हे नृत्य सादर केले. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सादरीकरण करताना सर्वप्रथम नांदी पंचतुंड नररुंड मालघर या गीतावर गायत्री चौधरी,पुनम पाटील, पूजा अग्रवाल साक्षी कल्याणकर, चेतश्री चौधरी यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर शुद्ध कथक सादरीकरण करताना त्यात मत्त तालावर नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये उर्वशी कोळी डिंपल गाढे हिमांशू जावळे यांनी आपले कसब दाखवले. त्यांना तबल्यावर शिरीष जोशी तर संवादिनीवर स्मिता कुलकर्णी यांनी साथ संगत केली व पढत चारू भालेराव यांनी केली. यानंतर विरा सोनवणे, हितांशी बेंडाळे, इशिता झासकर, काव्या तळेले, हेतल फेगडे, वंशिका पाटील, जीविका पाटील, इशिका जोशी यांनी डिमिक दिमिक डमरू बाजे या गाण्यावर नृत्य सादर केले.
यानंतर गणेश वंदना सादर करताना अदित्री दत्ता, स्वरा हेडा, दक्षता पालीवाल, अक्षिता सिंग, सांनवी चौधरी, कृतिका शर्मा, सानवी कुंभलकर यांनी नृत्य सादर केले. जुगलबंदीमधील तराना नुपूर भालेराव, मोक्षदा तळेले, अश्वती सपकाळ, जेसिका अब्राहम, मानसी पवार, जान्हवी खाडवे यांनी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
यानंतर कुचीपुडी नृत्य सादर झाले तसेच वाजत मृदंग अंग तरंग या गाण्यावर रेणुका सपकाळे, कृतिका झांबरे, रुचिता चौधरी, विकल्पा ठाकरे यांनी शिवस्तुती सादर केली. त्यानंतर कुमारी नुपूर भालेराव हिने कथक नृत्य सादर करून सर्व रसिकांची मने जिंकली.
शिव सुवर्णमालस्तुती या गाण्यावर जान्हवी खाडवे, चेतश्री चौधरी, गायत्री चौधरी, पुनम महाजन, गायत्री बाजारे, साक्षी कल्याणकर यांनी नृत्य सादर केले. कथक सरगम आणि तराना या प्रकारामध्ये प्राप्ती वाघ, अंबज्ञ जोशी, मीनाक्षी झांबरे, बुद्धिश्का सपकाळे, प्रयूषा फालक यांनी नृत्य सादर केले.
तराना प्रकारांमध्ये फ्युजन या नृत्यांमधून नुपूर भालेराव, उर्वशी कोळी, डिंपल गाढे यांनी आपली चमक दाखविली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कलावंत एकत्र येऊन नर्मदाष्टक सादर केले. यात नर्मदाची भूमिका मानसी भवते यांनी साकारली. यावेळी विशारद परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा व सहभागी सर्व कलावंतांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय पातळीवर नृत्याचा शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रसार करणार्या व्यक्तींना किंवा कलावंतांना नुपूर कथक डान्स अकॅडमीच्या वतीने दरवर्षी या महोत्सवात नृत्य श्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षी हा पुरस्कार रामा कौंडूल्य (आंध्रप्रदेश) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात शाल श्रीफळ आणि मानपत्र देण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी रितिक सोनार, शुभम बोलके, प्रांजल कुलकर्णी, गिरीश पाटील, प्रकाश फेगडे, भावेश फेगडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.







