माझ्या मृत्यूनंतर पत्नीला कोण सांभाळेल ! इस्त्रोतील निवृत्त कर्मचार्याने पत्नीचा आवळला गळा
Who will take care of my wife after my death? Retired ISRO employee strangles his wife बंगळुरू (20 फेब्रुवारी 2026) : आपल्या मृत्यूनंतर पत्नीची काळजी कोण घेईल, या भीतीतून निवृत्त इस्रो कर्मचार्याने आपल्या पत्नीचा गळा आवळला व आत्महत्येचा विचार केला मात्र विचार बदलल्याने त्याने शेजार्यांना ही माहिती दिल्यानंतर खुनाची घटना समेार आली.
काही मानसिक समस्यांवर उपचार
नागेश्वर राव (76) असे आरोपीचे नाव असून ते इस्रोमध्ये टीम लीडर होते. सध्या ते काही मानसिक समस्यांवर उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना व्हाईटफिल्ड परिसरातील बोम्मनहळ्ळी येथील ‘द व्हर्चुओसो’ या ज्येष्ठ नागरिकांच्या निवासी संकुलात बुधवारी सकाळी घडली.

जवळपास 20 मिनिटे मृतदेहाशेजारी बसून
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे 10.15 वाजता संध्या श्री (63) या स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना राव यांनी टॉवेलने त्यांचा गळा आवळला. त्या बेशुद्ध पडल्यावर राव जवळपास 20 मिनिटे मृतदेहाशेजारी बसून होते. त्यानंतर त्यांनी शेजार्याला फोन करून मी पत्नीची हत्या केली आहे, असे सांगितले. सुरुवातीला शेजार्याला हा विनोद वाटला मात्र राव वारंवार तेच सांगू लागल्याने शेजारी तातडीने घरी आले.
संध्या जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेल्या दिसल्यानंतर अपार्टमेंटमधील डॉक्टरांना बोलावण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असल्याने तेथे 24 तास रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध असतात. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि पोलिसांना माहिती दिली.
माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार?
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा राव सोफ्यावर बसलेले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, मी अजून तीन-चार वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार? असे सांगितले. हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशातील असून त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे.







