शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत काहुरखेडे शाळेच्या 28 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : शिवजयंतीनिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे, ता.भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. शाळेची एकूण पटसंख्या 64 असून त्यापैकी तब्बल 28 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत शाळेचा गौरव वाढविला.
विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल स्पर्धेला उपस्थित परीक्षक, पालक, शिक्षक तसेच अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक समाधान जाधव, मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे आणि उपशिक्षिका ममता तडवी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
अल्प पटसंख्या असलेल्या शाळेतून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.
दरम्यान, शिवजयंती निमित्त शाळेमध्येही सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याबरोबरच इतिहासाबद्दल अभिमान व प्रेरणा निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमास सरपंच गीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व शाळा परिवार उपस्थित होता.
विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थ्यांनी भुसावळ येथे तसेच संध्याकाळी गावामध्ये आयोजित शिवजयंती व्याख्यान कार्यक्रमांमध्येही प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतल्याबद्दल ग्रामस्थ व गावकर्यांनी मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, शिक्षक समाधान जाधव व उपशिक्षिका ममता तडवी यांचे विशेष कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत त्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे भरभरून अभिनंदन केले.







