अजित पवारांचा विमान अपघात की घातपात ? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल
Was Ajit Pawar’s plane crash or a suicide? Opposition leader Vijay Vadettiwar questions the government मुंबई (22 फेब्रुवारी 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? यावर सरकारने मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे, देशात यावर चर्चा सुरू असताना सरकार केवळ दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारच्या चहापानावर बहिष्कार
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या विमान अपघातावर सरकारकडून उत्तर दिले जात नसल्याचा आरोप करत आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. शासनाने फक्त दोन ओळींचं स्पष्टीकरण दिलं जाते, की अपघातावर कुणीही प्रश्न निर्माण करु नये.
का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? याची देशभरात चर्चा सुरू आहे. अशा वेळी आम्ही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणार्या चहापानाला का जायचं? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
भाजपच्या निवडणुकीतील जुन्या जाहिरातीचा संदर्भ देत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपाचे घोषवाक्य होते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आज आमचा प्रश्न तोच आहे की महाराष्ट्र आज कुठे आहे? शेतकरी, सामान्य माणूस सगळे कुठे आहेत? महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात अडकला आहे त्यामुळे कुठे आहे महाराष्ट्र हा प्रश्न निर्माण होतो, असे ते म्हणाले.
राज्यातील कृषी संकटावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी भीषण आकडेवारी सादर केली. केवळ गेल्या एका महिन्यात यवतमाळमध्ये 22 आणि मराठवाड्यात 76 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सावकाराच्या कर्जापोटी महाराष्ट्रातील शेतकर्याला आपली किडनी विकावी लागते, ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचेही ते म्हणाले. मक्याला 2400 रुपये हमीभाव असताना शेतकर्यांना केवळ 1500 ते 1600 रुपये मिळाले. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचीही मोठी लूट सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिकेची मागणी
दावोसमध्ये झालेले करार आणि राज्यातील प्रत्यक्ष गुंतवणूक यावर सरकारने ‘श्वेतपत्रिका’ काढलीच पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. केवळ जाहिरातबाजी करून महाराष्ट्र पुढे जाणार नाही, तर त्याचे वास्तव चित्र जनतेसमोर आले पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले.