महिनाभर दहशत : पिंपळगाव खुर्दमध्ये आक्रमक माकडाला पकडण्यात यश


भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : तब्बल महिनाभरापासून उपद्रव माजवणार्‍या माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. घरात शिरून अन्न -धान्याची नासधूस करणे, एकटे दिसणार्‍या ग्रामस्थांवर हल्ला करणे आदी प्रकार सुरू असल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली होते व माकडाच्या हल्लयात आतापर्यंत 35 हून अधिक ग्रामस्थ जखमी झाले होते. अखेर शनिवारी वनविभागाच्या प्रयत्नांनंतर संबंधित माकडाला पकडण्यात यश आले.

ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा श्वास
सुमारे महिनाभरापूर्वी माकडांची एक टोळी गावात दाखल झाली होती. काही दिवसांनी ती टोळी निघून गेली मात्र एक माकड गावातच थांबले. कालांतराने ते आक्रमक बनले. घरांच्या किचनमध्ये शिरून अन्न-सामग्रीची उधळण करणे, महिलांवर व वृद्धांवर झडप घालणे, रस्त्याने जाणार्‍यांचाा पाठलाग करणे असे प्रकार वारंवार घडू लागले त्यामुळे गावात भीतीचे सावट पसरले होते. अनेकांना उपचार घ्यावे लागले.

वनविभागाकडून तक्रारीची दखल
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार धाव घेतली. अखेर शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वनविभागाचे गोळेगाव वनपाल अनिल साळुंखे, वेल्हाळे वनरक्षक प्रसाद कुलकर्णी तसेच संरक्षण मजूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा येथून विशेष माकड पकडणारे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले. गावातील गल्लीबोळ, झाडांची दाटी आणि घरांच्या छपरांवरून उड्या मारणार्‍या माकडाचा माग काढत पथकाने सुमारे साडेतीन तास शिताफीने शोधमोहीम राबविली.

दुपारी सुमारे ती वाजण्याच्या सुमारास अखेर संबंधित माकडाला जेरबंद करण्यात यश आले. या कारवाईदरम्यान सरपंच लक्ष्मण पाटील, माजी सरपंच तुषार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून सहकार्य करत होते. पकडलेल्या माकडाला सुरक्षितपणे पिंजर्‍यात बंद करून सायंकाळी जंगलात सोडण्यात आले. माकड पकडल्याची बातमी गावभर वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !