अडीच लाखांची लाच भोवली : शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribe of Rs 2.5 lakhs taken : Shahada Panchayat Samiti’s junior assistant caught by ACB भुसावळ (24 फेब्रुवारी 2026) : चौकशीचा अहवाल अनुकूल देण्यासाठी अडीच लाखांची लाच मागून ती स्विकारताना शहादा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक अभिजीत गोवर्धन भावसार (43) यास नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. या प्रकरणात आता वरिष्ठांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
42 वर्षीय तक्रारदार ग्रामपंचायत अधिकारी असून ते कार्थदा दिगर, ता.शहादा जुलै 2024 ते जुलै 2025 दरम्यान कार्यरत असताना तक्रारदाराच्या काळात झालेल्या कामांची चौकशी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर करण्यात आली होती मात्र चौकशीचा अहवाल मोघम असल्याने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अहवालावर शहादा पंचायत समितीकडून स्पष्ट अभिप्राय मागितला होता. चौकशीचे कामकाज अभिजीत भावसार यांच्याकडे असल्याने 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी तक्रारदाराला गटविकास अधिकार्‍यांसमक्ष दप्तर हजर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर दप्तर तपासणीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तक्रारदाराकडे 23 रोजी अडीच लाखांची लाच मागण्यात आली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. शहादा शहरातील हॉटेल स्पाईस अ‍ॅण्ड ग्रिलजवळ लाच स्वीकारताच भावसार यांना अटक करण्यात आली.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार हेमंतकुमार महाले, हवालदार देवराम गावीत, हवालदार विजय ठाकरे, हवालदार संदीप खंडारे, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !