साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात
भुसावळ (27 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्था संचालक गोपाळ भगत होते.
विचार मंचावर यांची उपस्थिती
विचारपीठावर मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे उपस्थित होत्या. यावेळी भावना झाडगे, संगीता जंगले, भारती खडसे, मालती श्रीखंडे आदी शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदर व्यक्त करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मराठी दिनावरील गीतांवर आकर्षक व तालबद्ध नृत्य सादर केले.
लहानग्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या सादरीकरणातून मराठी भाषेबद्दल चा अभिमान प्रभावीपणे व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व देखण्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ भगत यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना, मराठी ही आपली मायबोली असून तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची जाणीव करून देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.