भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शहिदी समागम वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
Various programs on the occasion of the martyrdom anniversary at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात हिंद दि चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची सुरुवात 10 फेब्रुवारी 2026 पासून करण्यात आली. 10 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली.
घोषणेतून जनजागृती
विद्यार्थ्यांच्या हातात गुरुजींच्या जीवनकार्यावर आधारित फ्लायर्स, घोषणा व स्लोगन्स देऊन जनजागृती करण्यात आली. 13 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनकार्याचे प्रभावी चित्रण केले. 17 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विचारस्वातंत्र्य, धर्मनिष्ठा व बलिदान या मूल्यांवर आपली मते मांडली.


20 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता तुकडी निहाय निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यासोबतच ऐतिहासिक जाणीवा विकसित होण्यास मदत झाली.
24 फेब्रुवारी 2026 रोजी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा सिंगसभा’ भुसावळचे स्टेज सेक्रेटरी श्री. राजेंद्र सिंह बुडवाल व शिक्षक श्री. शैलेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना गुरुजींच्या विचारांची माहिती दिली.
25 फेब्रुवारी 2026 रोजी गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावर आधारित कथांचे वाचन स्पर्धा घेण्यात आली. याच दिवशी त्यांच्या जीवनकालावर आधारित 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत ऐकवण्यात आले व त्या गीतावर आधारित एकल व समूह गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी डी.जी.जाधव, नायब तहसीलदार हेमंत गुरव, भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे व पंचायत समितीचे विषय तज्ज्ञ संजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
अभिवाचन स्पर्धेचे आयोजन
कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत गुरु तेग बहादूर साहेब व त्यांच्या शिष्यांमधील शहिदीपूर्व संवाद तसेच औरंगजेब व गुरु तेग बहादूर साहेब यांच्यातील संवादाचे नाट्यरूप सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. उपक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, ज्येष्ठ शिक्षक बी.बी.जोगी, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, संगणक विभागासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.