यावल पालिकेत 274 कोटींचा अर्थसंकल्प सादर : सव्वा कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधींचे उड्डाण असलेल्या अर्थसंकल्प सादर ः कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा
Budget of Rs 274 crores presented in Yaval Municipality: Balance budget of Rs 1.25 crores approved यावल (1 मार्च 2026) : यावल नगरपरिषदेमध्ये शनिवारी तब्बल 274 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोट्यवधींच्या विविध विकासकामांचा समावेश आहे. हा अर्थसंकल्प तब्बल एक कोटी 29 लाख 59 हजार 410 रुपयांचा शिलकी आहे. या अर्थसंकल्पात प्रपत्र 6 जोडून सदर निधी कोणत्या कामात किती प्रमाणात खर्च होईल ? याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली आहे.
क्रीडांगणासाठी चार कोटींची तरतूद
प्रामुख्याने नगरपरिषदेच्या मालकीच्या क्रीडांगणासाठी चार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली तर शहराच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून देखील निधीची तरतूद करण्यात आली. यावल नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष छाया अतुल पाटील, उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकुब यांच्या वतीने आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात तब्बल 274 कोटी रुपयाचे हे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना प्र पत्र 6 नसल्याची व सदर मोघम स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी नगराध्यक्ष व सभागृहाला सांगितले. प्रपत्र 6 हे तत्काळ तयार करण्याच्या सूचना केल्यानंतर कशा पद्धतीने 274 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल आणि तो कुठे आणि कसा खर्च होईल हे प्रपत्र सहानुसार सभागृहात सादर करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.


यांची होती उपस्थिती
या सभेत काँग्रेसच्या गटनेता कमरुन्निसाबी सैफुद्दीन,भाजपाच्या गटनेता नंदा महाजन, शिवसेना उबाठा गटनेता सागर चौधरी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेता वर्षा चोपडेसह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांची उपस्थिती होती. या सभेमध्ये 274 कोटी 09 लाख 44 हजार 262 रुपयाचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर यात खर्च हा 272 कोटी 79 लाख 84 हजार 852 अपेक्षित असून हा अर्थसंकल्प 1 कोटी 29 लाख 59 हजार 410 रूपये शिलकी असल्याचे अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आले. तसेच या अर्थसंकल्पात कुठल्याच प्रकारे कर वाढ नसल्याने शहरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीडीपी केला होता तयार. 2021 मध्ये यावल नगरपालिकेने सीडीपी तयार केला होता त्यात विविध विकास कामे घेण्यात आली होती. त्याच अनुषंगाने महानगरोथान योजनेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची कामे करणे शक्य होईल. पूर्वी नियोजन करून या योजना प्रस्तावित केल्या होत्या त्यात आज शेळगाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे व भविष्यात शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. यासाठीच अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. विकास आराखड्यातील आरक्षण असलेली क्रीडांगणाची जागा विकसीत केली जाणार आहे, पुरातन वास्तू संवर्धन योजनेतून यावलचे वैभव असलेला किल्ला सुशोभीकरण करण्यात येणार असून विस्तारीत भागात रस्ते करण्यात येणार आहे. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून भविष्यात यावल शहराला विकासाची दिशा मिळवून देईल असे मत माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केले.






