यावल नगरपालिकेत महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान
यावल (9 मार्च 2026) : यावल नगर परिषदेत प्रथमच जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील इयत्ता दहावी व बारावीत गुणवत्ता मिळवलेल्या व शैक्षणीक क्षेेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणार्या विद्यार्थिनींना सन्मानीत करण्यात आले.
नगरपरिषेकडून स्मृतीचिन्ह देऊन विद्यार्थिनींना रोख स्वरूपाचे बक्षीस देखील देण्यात आले. या कार्यक्रमात महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरातील महिलांच्या विकास कसा होईल या दृष्टिकोनातून चर्चा देखील करण्यात आली व महिलांची मते जाणून घेण्यात आली.
यावल नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष सईदाबी शेख मोहम्मद याकूब, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेविका वैशाली बारी, नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक विशाल काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात शहरात बचत गटाच्या माध्यमातून विविध लक्षणीय कामगिरी करणार्या महिलांच्या कामगीरीची माहिती देण्यात आली. तसेच शहरातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. त्यांना स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपाची बक्षीस म्हणून रक्कम देण्यात आली. सूत्रसंचालन कर अधीक्षक संभाजी कोल्हे यांनी केले. यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी गजानन महाजन, समुह संघटक सीमा दिवे आदींनी परिश्रम घेतले.







