महाशिवपुराण कथा : पाच वाहतूक मार्गात पोलिसांकडून बदल
Mahashivpuran story : Police changes five traffic routes भुसावळ (9 मार्च 2026) : अकलूद शिवारात होत असलेल्या पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातर्फे संभाव्य गदींचा अंदाज घेवून पाच ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल केला आहे. एस.टी. महामंडळातर्फे 50 अतिरिक्त बसेस कथेसाठी सोडण्यात येणार आहे. दोन ठिकाणी तात्पुरते बस डेपो निर्माण करून व्यवस्थेसाठी 50 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
सात लाखांवर भाविक येणार
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वाहतुकीत मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 10 ते 16 मार्च दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील. भुसावळहून कथास्थळी जाण्यासाठी 15 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळातून कथास्थळासाठी 16 रुपये भाडे लागेल. दुसरा डेपो कथास्थळी तयार करण्यात आला आहे. कथेसाठी सोडण्यात येणार्या 20 बसेसच्या नियोजनासाठी सुपरवाझर व 30 कर्मचारी असे 50 कर्मचारी दोन शिफ्टमध्ये नेमण्यात आल्याचे विभाग नियंत्रक डी.जी. बंजारा यांनी सांगितले.
वाहतुकीसाठी हा मार्ग बंद
भुसावळ ते फैजपूर रोड हटिल रिव्हर पॉईटपासून ते भौरटेक फाट्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
भुसावळ ते फैजपूर (एस.टी.बस, कार, रिक्षा, दुचाकी) यांना
अकलुद जुना टोल नाका येथून यावलमार्गे फैजपूरकडे जाता येईल व परतीच्या प्रवासासाठी फैजपूरकडून यावलमार्गे (टी पॉईटपासून) भुसावळ तापी पुलावरून भुसावळकडे जाता येईल, त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
रावेर-सावदा-फैजपूर ते भुसावळ (लहान वाहने)
ही वाहने बनाना सिटी सावदा येथून वळवून हतनूर-बोहर्डी फाटामार्गे भुसावळकडे जातील
रावेर-सावदा-फैजपूर ते भुसावळ (जड वाहने)
अवजड वाहने यावल-किनगावमार्गे जळगाव-भुसावळकडे वळवण्यात आली आहेत
चोपडा-यावल ते भुसावळ
ही वाहतूक धानोरा फाटा येथून वळवून डांभुर्णी-जळगावमार्गे भुसावळकडे जाईल. कथा संपेपर्यंत असे नियोजन असेल.
भुसावळ ते फैजपूर (अवजड वाहने)
भुसावळकडून तापी पुलावरून फैजपूरकडे येणारी जड वाहने जळगाव-डांभुर्णी-किनगाव-यावलमार्गे फैजपूरकडे जातील.







