अडीच लाखांची लाच भोवली : जात पडताळणी विभागाच्या उपसंचालिका एसीबीच्या जाळ्यात
Bribe of ₹2.5 Lakhs Proves Costly : Deputy Director of Caste Verification Department Caught in ACB Net रायगड, ठाणे (15 मार्च 2026) : अडीच लाखांची लाच स्वीकारताना कोकण विभागाच्या उपसंचालिका (संशोधन) मीनाक्षी नारायण उन्हाळे यांना रायगड एसीबीने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्राची फाईल मंजूर करण्यासाठी अडीच लाखांची लाच मागताना रायगड युनिटने ठाण्यातील उन्हाळे यांच्या कार्यालयातच हा सापळा यशस्वी केला. अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील भ्रष्टाचार या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.
काय आहे लाच प्रकरण ?
54 वर्षीय तक्रारदाराच्या पत्नी आणि मुलीचे अनुसूचित जमाती (एसटी) पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची फाईल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे कार्यालयात प्रलंबित होती. ही फाईल क्लिअर करून देण्यासाठी उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी दोन लाख 50 हजारांच्या लाच मागितली व तक्रारदाराने 12 मार्च 2026 रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची दखल घेत विभागाने 13 मार्च रोजी पडताळणी केल्याने उन्हाळे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.




कार्यालयात लाच घेताना पकडले
दरम्यान, शुक्रवारी दुपारी 4:10 वाजेच्या सुमारास एसीबीने ठाण्यातील कोकण भवन परिसरातील त्यांच्या कॅबीनमध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना पथकाने उन्हाळे यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने आरोपी मीनाक्षी उन्हाळे यांचा मोबाईल जप्त केला असून, त्यांच्या ठाण्यातील राहत्या घराची (खेवरा सर्कल, मानपाडा) झडती घेण्यात आली. याप्रकरणी ठाणे शहर येथील नौपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सरीता भोसले यांनी केली. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.