पारंपारिक वेशभूषेत धावून साजरा केला गुढीपाडवा सण

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम : मानसिक आरोग्य या विषयावर डॉ. केतकी पाटील यांचे विशेष मार्गदर्शन


Gudi Padwa भुसावळ (21 मार्च 2026) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा हिंदू तसेच मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हटला जातो. त्याप्रसंगी बिसारा लेडीज इक्वलिटी रनचे आठवे ट्रेनिंग सेशन गुरुवार, 19 मार्च रोजी शहरातील कृष्णचंद्र सभागृहाच्या शेजारी संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या. सर्वप्रथम सकाळी सहा वाजेच्या आधीच सर्वच महिला धावपटू साडी, नऊवारी पातळ आदी पारंपारिक वेशभूषा करून मैदानावर हजर झाल्या. त्यावेळी संपूर्ण वातावरण खूपच उत्साहाचे होते. त्यानंतर वार्म अप व्यायाम प्रकार घेण्यात आला व त्यानंतर प्रत्यक्ष धावायला सुरुवात झाली.

पारंपरिक वेशभूषेत धावताना सुरुवातीला जरी अडचण वाटली, तरी सर्वच महिलांनी या रन चा मनापासून आनंद घेतला. अगदी हसत हसत, कुठे सेल्फी घेत, कुठे ग्रुप फोटो काढत तर काही अंतर धावताना शूटिंग करत सर्व महिला धावपटूंनी उत्साहात चार किलोमीटरचे धावणे पूर्ण केले. धावताना वाहतुकीचे व रहदारीचे योग्य नियमन करण्यात आले. त्यानंतर मैदानावर परतल्यावर स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त विशेष कार्यक्रमास सुरुवात झाली.


याप्रसंगी सर्वप्रथम जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील यांचे स्वागत असोसिएशनतर्फे डॉ निलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील व स्वाती फालक यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले. त्यानंतर मानसिक आरोग्य प्रत्येक व्यक्तीसाठी किती आवश्यक आहे त्याविषयी डॉ केतकी पाटील यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. याप्रसंगी केवळ महिलांचेच मानसिक आरोग्य गरजेचे नसून कुटुंबातील पुरुषांचे सुद्धा मानसिक आरोग्य चांगले असायला हवे, जेणेकरून त्याचा फायदा कुटुंबात व कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला होईल असे देखील त्यांनी प्रतिपादन केले. त्याचबरोबर आजच्या आजच्या आधुनिक युगात विज्ञानासोबतच अध्यात्माची देखील जोड असायला हवी, जेणेकरून आपले मानसिक स्वास्थ आनंदी राहील, असेदेखील त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रवीण फालक होते. या विशेष रनमध्ये गारगी भोळे व अवनी चंदन या बालिकांनी रनचे नेतृत्व केले व त्यांच्या मागे महिला धावपटू व त्यानंतर पुरुष धावपटू असे रनचे नियोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी सुयश न्याती, संजय तिवारी, प्रविण वारके, प्रशांत वंजारी यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !