भुसावळातील रोटरी रेल सिटीने साजरा केला रोप्य महोत्सव
भुसावळ (25 मार्च 2026) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी ची स्थापना 21 मार्च 2001 रोजी भुसावळ येथे काही समाजसेवी तरुण मंडळींनी केली होती. या क्लबची प्रगतीशील वाटचाल होत यावर्षी 21 मार्च 2026 रोजी रोटरी रेल सिटीला 25 वर्ष पूर्ण झाले.त्यानिमित्ताने ‘नमन नेतृत्वास’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी अध्यक्षांचा सपत्नीक सत्कार
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी हा गेल्या काही वर्षांपासून भुसावळ शहरातील एक क्रीडा,कला व विविध सामाजिक विषयांमध्ये भरीव कार्य करणारी प्रभावी सामाजिक संस्था म्हणून उदयास आली आहे. याचा प्रत्यय भुसावळकरांनी अनेकदा घेतलेला आहे. भुसावळकरांच्या सेवेमध्ये रोटरी दांडिया,सायक्लॉथॉन,भुसावळ रन,भुसावळ ऑलिंपिक, वृक्षारोपण, उन्हाळ्यात जलसेवा, भुसावळ प्राईड अवॉर्ड अशा एक ना अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक उपक्रमांची भर रोटरी रेल सिटी दरवर्षी घालत असतो. या क्लबमधील मागील 25 वर्षात ज्यांनी या क्लबचे नेतृत्व केले होते अशा सर्व माजी अध्यक्षांचा सपत्नीक सत्कार सोहळा या निमित्ताने प्रभाकर हॉलमध्ये शनिवार, 21 मार्च रोजी संध्याकाळी पार पडला.

यांची होती उपस्थिती
या माजी अध्यक्षांमध्ये अभय हरणे (संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ), प्रतिथयश बिल्डर सुशील राका (धुळे), उद्योजक योगेश यावलकर (पुणे) यांच्यासह अनेक माजी प्रतिष्ठित सदस्यांचा समावेश होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुढील वर्षाचे होणारे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.राजेश पाटील, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भुसावळातील प्रगतशील उद्योजक अश्विन भाई परदेसी हे होते.
क्लबची स्मरणिका सुद्धा प्रकाशित करण्यात आली. त्याचे संपादन रोटेरियन श्रीकांत जोशी यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमित सिंग माखन, तसेच प्रोजेक्ट चेअरमन हरविंदर सिंग व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




