नववधू-वरांकडून बोरावल बुद्रुक शाळेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान-गणित साहित्य भेट
यावल (28 मार्च 2026) : यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील एका नवविवाहित दाम्पत्याने विद्यार्थ्यांना साहित्य भेट दिले. लग्न खर्च काही प्रमाणात वाचवून ग्रामिण भागातील शाळेला विज्ञान-गणित साहित्य भेट देण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला. या दाम्पत्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आदर्श उपक्रमाचे कौतुक
लग्न समारंभातील खर्चाचा काही भाग समाजोपयोगी कार्यासाठी वापरत नववधू-वरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान व गणिताचे शैक्षणिक साहित्य भेट देत एक आदर्श उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शारदा माध्यमिक विद्यालय, दीपनगर (ता.भुसावळ) येथील सेवानिवृत्त शिक्षक डॉ.संजू भटकर व महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ येथील शिक्षिका अलका भटकर यांचे चिरंजीव समृद्ध यांचा विवाह मीनाक्षी यांच्याशी झाला. पालक शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन संचलित एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित गणित पेटी व विविध विज्ञान अॅक्टिव्हिटी किट्स बोरावल बुद्रुक (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आले. हे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक अमित पाटील व शिक्षिका कविता महाले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर, नेहरू विद्यामंदिर तळवेलचे मुख्याध्यापक एस.एस. अहिरे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे, संचालक विक्रांत चौधरी तसेच एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे चेअरमन सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. शाळेला विज्ञान व गणित साहित्य भेट दिल्याबद्दल पोलीस पाटील गोकुळ शंकोपाळ व गोकुळ कोळी यांनी नववधू-वरांचे आभार मानले. या साहित्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित गणित पेटी, विज्ञानातील विविध प्रयोग साहित्य, डोळ्याची रचना, पानाची रचना, रॉकेट, चांद्रयान-3 यांचे मॉडेल्स तसेच गणिती कोडी (पझल्स) यांचा समावेश होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.




