नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बनावट दारुसाठी लागणारे नऊ लाखांचे स्पिरीट जप्त
Major Operation by Nandurbar Crime Branch : Spirit Worth ₹9 Lakhs, Used for Manufacturing Illicit Liquor, Seized नंदुरबार (31 मार्च 2026) : अवैधरित्या तयार करण्यात येत असलेल्या दारुसाठी लागणार्या तब्बल नऊ लाखांच्या स्पिरीटचा साठा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईने अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट दारु बनवली जात असल्याचा दाट संशय आहे.
गोपनीय माहितीवरुन कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिरपूर, जि.धुळे येथून कहाटूळमार्गे धडगावकडे एका पांढर्या रंगाच्या बोलेरो वाहनात दारु तयार करण्यासाठी लागणार्या स्पिरीटची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह सापळा रचला. शहादा शहरातील मामाचे मोहिदा चौफुली परिसरात पांढर्या रंगाचे बोलेरो वाहन (एम.एच.04 इ.एस. 9651) ला अडवल्यानंतर त्यातून तब्बल 550 लिटर स्पिरीट (दारु तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयीत वसंत कुसाल पावरा (26, रा.बिलगाव, पोस्ट चिखली, ता.धडगाव, जि.नंदुरबार) यास अटक करण्यात आली तर पावरासोबतचा अन्य एक इसम अंधारात पसार झाला. आठ लाख 65 हजारांचे स्पिरीट व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुध्द शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, जितेंद्र पाडवी, नाईक विकास कापुरे, कॉन्स्टेबल शोएब शेख, भरत उगले, सतीष घुले आदींच्या पथकाने केली.




