भुसावळ बस स्थानकाच्या आवाराचे हवे काँक्रिटीकरण : मनसेची मागणी
भुसावळ (2 एप्रिल 2026) : भुसावळ बस स्थानकाच्या विकासासाठी काँक्रिटीकरण निधी मंजूर असलातरी अद्यापही काँक्रिटीकरण होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकाच्या आवारात धुळीचे साम्राज्य असून रस्ता ओबड धोबड आहे. या बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, प्रवास करतात त्यामुळे त्यांना मोठा त्रास सोसावा लागतो. तातडीने बसस्थानकाचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी मनसेतर्फे आगार प्रशासनाला करण्यात आली.
दोन कोटींचा निधी मंजूर
गत पाच वर्षांपासून बसस्थानकाच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर असूनही काँक्रिटीकरण झालेले नाही. बस स्थानकाची प्रस्तावित जागा अद्याप मिळाली नसल्याचे कारण दिले जाते मात्र आजची समस्या पाहता सद्यस्थितीत बसस्थानकात सुरू असलेल्या जागेचे काँक्रिटीकरण गरजेचे आहे.



तत्काळ या विषयाला अनुसरून काम सुरू करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, सुशील मोरे तालुका सचिव विलास कोळी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





