भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

रेल्वेकडून प्रवाशांना चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळण्याचे आवाहन


भुसावळ (4 एप्रिल 2026) : धावत्या रेल्वे गाडीत चढणे-उतरणे धोक्याचे असतानाही काही प्रवासी जीव धोक्यात घालून हा प्रकार करतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. शुक्रवार, 3 एप्रिल 2026 रोजी भुसावळ जंक्शनवर असेच धाडस एका प्रवाशाने केले मात्र सतर्क रेल्वे सुरक्षामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.

काय घडले स्थानकावर ?
पुणे-जम्मूतवी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11077) सुटण्याच्या तयारीत असताना एका प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला आणि तोल जाऊन तो असंतुलित झाला. या गंभीर परिस्थितीत भुसावळ रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलज्ञचे प्रधान आरक्षक एस. एस. खेडेकर यांनी तत्परता आणि सूजबूज दाखवत प्रवाशाला खेचून चालत्या गाडीपासून दूर केल्याने मोठा अपघात टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले.


रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन
ही घटना चालत्या गाडीत चढणे किंवा उतरल्यामुळे होणार्‍या धोक्यांचे स्पष्ट उदाहरण आहे. क्षणभराची चूकही जीवघेणी ठरू शकते. रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की, गाडी पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे किंवा उतरावे. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान देशभरात आपल्या धाडस आणि मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण देत वेळेवर हस्तक्षेप करून अनेकांचे प्राण वाचवत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !