भुसावळ बाजारपेठ पोलिसांचे जनजागृती अभियान ; नागरिकांना सतर्कतेचे धडे
Bhusawal Bazarpeth Police Launch Public Awareness Campaign; Imparting Lessons on Vigilance to Citizens भुसावळ (13 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षा व सतर्कतेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुरक्षात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे पार पडले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना दैनंदिन जीवनात घ्यावयाच्या सुरक्षात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

‘सी.ई.आय.आर’ पोर्टलबाबत विशेष मार्गदर्शन
अभियानादरम्यान ‘सी.ई.आय.आर’ पोर्टलबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास या पोर्टलच्या माध्यमातून पोलीस विभाग त्याचा शोध घेऊ शकतो, अशी माहिती नागरिकांना देण्यात आली. यामुळे अनेकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळविण्याचा विश्वास निर्माण झाला.
यांचा अभियानात सहभाग
गर्दीच्या ठिकाणी वाढणार्या गुन्हेगारी प्रकारांबाबत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः मोबाईल चोरी, सोन्याचे दागिने चोरी आणि खिसे कापूंच्या घटनांपासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सतर्क नागरिक, सुरक्षित शहर हा संदेश या अभियानातून प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. एनसीसी व बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या जनजागृती अभियानामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.









