अजिंठा भित्तिचित्रांचे जागतिक दूत मेजर रॉबर्ट गील यांना भावपूर्ण अभिवादन


A heartfelt tribute to Major Robert Gill, the global ambassador of the Ajanta murals. भुसावळ (13 एप्रिल 2026) : आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनतर्फे अजिंठा भित्तिचित्रांचे जागतिक स्तरावर प्रबोधन करणारे महान चित्रकार मेजर रॉबर्ट गील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. शहरातील ख्रिश्चन दफनभूमीत मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिक प्रार्थनेद्वारे कार्यक्रम पार पडला.

योगदानाची दखल नाही
अजिंठा लेणींच्या अप्रतिम भित्तिचित्रांना आपल्या कुंचल्यातून जगाच्या नकाशावर पोहोचवणार्‍या मेजर रॉबर्ट गिल यांनी आयुष्यभर या कार्यासाठी झटले, मात्र त्यांच्या योगदानाची म्हणावी तशी दखल आजही घेतली गेलेली नाही, अशी खंत प्रमुख अतिथी प्राचार्य राजू महाजन (चोपडा) यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते चित्रकार राजू बाविस्कर, सप्तपुत्र ललित कला भवनाचे प्राचार्य अतुल मालखेडे, मध्य रेल्वे भुसावळचे सीनियर डी.ई.एन. समन्वय पंकज धावरे, आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनचे राजेंद्र जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी काळ्या-निळ्या रेषा या आत्मकथनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू बाविस्कर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

इतिहास अभ्यासक प्रा. उत्तम सुरवाडे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभाग, केंद्र शासन आणि रेल्वे विभाग यांच्या समन्वयातून अजिंठा भित्तिचित्रांचा प्रचार-प्रसार देशभर करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमात डॉ.सतीश कुलकर्णी लिखित मेजर रॉबर्ट गिल यांच्या जीवनावरील पोवाड्याचे क्यूआर कोड स्कॅनद्वारे विमोचन करण्यात आले. सेंट्रल स्कूलच्या संगीत शिक्षिका सौ. स्मिता कुलकर्णी यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांना भावूक केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य अतुल मालखेडे यांनी गील यांच्या अद्वितीय कलेचा गौरव करत, त्यांच्या योगदानाची आठवण सदैव प्रेरणादायी राहील, असे सांगितले. तसेच प्राचार्य राजू महाजन यांनी गिल यांच्या समाधीचा शोध लावणारे स्व. प्रकाश तांबटकर आणि अभ्यासक डॉ. पी. डी. जगताप यांच्या कार्याचाही गौरव केला.

यावेळी अजिंठा विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. श्रीकांत जोशी, रमाकांत भालेराव, विकास चौधरी, मनोहर झांबरे, श्रीकांत पवार, जयश्री चौधरी, युवराज लोधी, नितीन अडोकमल आदींचे सहकार्य लाभले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !