भुसावळातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम


भुसावळ (14 एप्रिल 2026) : शहरातील नंदनवन कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवार, रोजी मंत्री संजय सावकारे व त्यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी सकाळी 10.30 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची विधीवत आरती व पूजन मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

या धार्मिक सोहळ्यास केंद्रातील सेवेकरी, भक्तगण व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात श्री स्वामी समर्थ नामघोष घुमत असल्याने वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले..


सेवेसाठी निःस्वार्थ भावनेने पुढे येण्याचे आवाहन
आरती व पूजनानंतर मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थित सेवेकर्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदू धर्माच्या सेवेसाठी प्रत्येकाने निःस्वार्थ भावनेने पुढे येण्याची आवश्यकत आहे. गुरुमाऊलींप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा व पवित्रता जपून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेणे हीच खरी सेवा आहे. सेवाभाव, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा संगम साधत कार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी रजनी सावकारे यांनीदेखील गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना अर्पण करून केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सेवेकर्‍यांच्या निष्ठा व समर्पणाचे कौतुक करत भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमामुळे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसर भक्ती, श्रद्धा व उत्साहाने न्हाऊन निघाला होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !