भुसावळातील रेल्वेचा वारसा जतनासाठी चिमुकल्यांचा ‘कुंचला’ सरसावला
भुसावळ (18 एप्रिल 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सध्या ’जागतिक वारसा सप्ताहा’चा उत्साह ओसंडून वाहत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे स्कूलमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा जणू संकल्पच सोडला. आपत्ती व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद या गंभीर विषयाला चिमुकल्यांनी आपल्या कल्पकतेने कॅनव्हासवर अत्यंत प्रभावीपणे मांडले.
दरवर्षी 15 ते 18 एप्रिल दरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो.यंदा रेल्वे प्रशासनाने केवळ उत्सव न साजरा करता,भावी पिढीमध्ये या ऐतिहासिक ठेव्याबद्दल जाणीव निर्माण करण्यावर भर दिला आहे.आपत्तीच्या काळात किंवा युद्धासारख्या संघर्षाच्या परिस्थितीत आपला ऐतिहासिक वारसा कसा जपला जावा, हा या स्पर्धेचा मुख्य केंद्रबिंदू होता.या चित्रकला स्पर्धेने वारसा सप्ताहात एक वेगळीच रंगत आणली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


