यावल शहरात बहिरमबुवा व काळ भैरव महाराजांच्या बारागाड्या ; भाविकांची अलोट गर्दी
The ‘Baragadya’ processions of Bahirambuva and Kal Bhairav Maharaj take place in Yawal city, drawing an immense crowd of devotees यावल (22 एप्रिल 2026) : यावल शहरातील फैजपूर रस्त्यालगत विस्तारीत भागातील बहिरम बुवा व बसस्थानक आवारातील काळ भैरव महाराजांची यात्रा रविवारी उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त फैजपूर रस्त्यावरून थेट बुरूज चौकापर्यंत बारा गाड्या ओढण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाविक-भक्तांची शहरात गर्दी होती.
भाविकांची मोठी गर्दी
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावलला काळभैरव महाराज व बहिरम बुवांची यात्रा रविवारी पार पडली. या निमित्ताने सायंकाळी फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिरापासून बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत किशोर दगडू बारी, बगले रोहित ज्ञानेश्वर कोळी, तन्मय सुखदेव बारी यांनी बाबुराव रावजी बारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारागाड्या ओढण्यात आल्या.

पांडुरंग सराफ नगराजवळील मनुदेवी मंदिरापासून तर बुरुज चौकापर्यंत या बारागाड्या ओढण्यात आल्या. यावलसह परिसरातील नागरिकांनी बारा गाड्या पाहण्यासाठी गर्दी केली. भगत व भाविक बारीवाड्यापासून वाजत-गाजत मेन रस्त्याने काळभैरव मंदिरात आले. तिथून दर्शन घेऊन पांडुरंग सराफ नगरातील बहिरम बुवा मंदिराजवळ दर्शनासाठी भगत गेले व नंतर पाच प्रदक्षिणा बारा गाड्यांना केल्यावर बारा गाड्या ओढण्यात आल्या.
संध्याकाळी सर्व शहरातील भाविकांनी व नागरिकांनी बारागाड्या ओढल्या. या गाड्यांवर मोठ्या संख्येत भाविक-भक्त बसले होते. हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. बारागाड्यांच्या कार्यक्रमात यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

