पारस-गायगाव-अकोला विभागात ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यरत
पारस स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यशस्वीरित्या सुरू
भुसावळ (23 एप्रिल 2026) : भुसावळ रेल्वे विभागाने रेल्वे आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पारस-गायगाव-अकोला विभाग (19.91 कि.मी.) येथे 23 रोजी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन केले आहे. या नव्या प्रणालीमुळे या विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या उपक्रमांतर्गत भुसावल-अकोला विभागातील एकूण 135 कि.मी. अंतरावर ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीमध्ये 24 ऑटो सिग्नल व 12 सेमी-ऑटो सिग्नल, 48-फायबर जऋउ तसेच युएफएसबीआय इंटिग्रेशनद्वारे उच्च स्तराची रेडंडन्सी उपलब्ध करून देण्यात आली. अकोला स्थानकातील आरआरआई प्रणाली व गायगाव स्थानकातील सिमेन्स इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीच्या कार्यान्वयनामुळे या विभागाची लाईन क्षमता वाढणार असून भुसावल-बडनेरा या अत्यंत व्यस्त मार्गावरील गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि वेळेवर धावण्यास मदत होऊन प्रवाशांना अधिक चांगला प्रवास अनुभव मिळेल.
पारस स्थानकावर यार्ड रीमॉडेलिंग अंतर्गत क्योसान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे 23.04.2026 रोजी यशस्वी कार्यान्वयन करण्यात आले. यासोबतच 23 वर्षे जुनी पॅनेल इंटरलॉकिंग प्रणाली बदलून अत्याधुनिक सिग्नलिंग उपकरणे बसविण्यात आली आहेत.
