पोलिसांसह सर्वसामान्य नागरिक ठरवणार रुग्णांसाठी ‘देवदूत : भुसावळात अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

पोलीस दल, डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम, पोलीस, पेट्रोल पंप, हॉटेल व्यावसायिकांनी घेतला प्रत्यक्ष सराव


Police and Citizens Alike to Become ‘Angels’ for Patients: First Aid Training in Bhusawal to Save the Lives of Accident Victims भुसावळ (14 मे 2026) : रस्ते अपघातानंतर पहिल्या काही मिनिटांत मिळणारी मदत जखमी व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते मात्र अनेकदा योग्य पद्धत्तीने उपचार न मिळाल्याने रुग्णांचे प्राण दगावतात. वाढत्या अपघात व त्यातून होणारी हानी लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस दल आणि गोदावरी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अपघातग्रस्तांना त्वरित मदत मिळण्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे शहरात आयोजन करण्यात आले.

नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद
गोदावरी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सोमवारी झालेल्या या कार्यशाळेला पोलीस अधिकारी, कर्मचारी, पेट्रोल पंप चालक, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.







तत्परतेचे सांगितले महत्व
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून पोलीस दलाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डीवायएसपी केदार बारबोले यांनीही उपस्थित राहून अपघातग्रस्तांना मदत करताना आवश्यक असलेल्या तत्परतेचे महत्त्व अधोरेखित केले.

सखोल प्रशिक्षण
कार्यशाळेत गोदावरी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.वैभव पाटील आणि डॉ.सतीश पी यांनी प्रथमोपचार, आपत्कालीन परिस्थितीत जखमी व्यक्तीला हाताळण्याची पद्धत, रक्तस्त्राव थांबविण्याचे प्राथमिक उपाय, तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत घ्यावयाची काळजी याबाबत सखोल प्रशिक्षण दिले.यावेळी फर्स्ट-एड किटचा योग्य वापर कसा करावा? याचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर
सोमवारी झालेल्या शिबिरात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सीपीआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ठरले. हृदयविकाराचा झटका आलेल्या किंवा श्वासोच्छवास बंद पडलेल्या व्यक्तीला तातडीने दिल्या जाणार्‍या सीपीआर’ प्रक्रियेचे प्रात्यक्षिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महामार्गालगतचे पेट्रोल पंप चालक व हॉटेल व्यावसायीकांनी स्वतः प्रत्यक्ष सराव करून हे कौशल्य आत्मसात केल्याने अपघाताच्या प्रसंगी तातडीची मदत देण्याबाबत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

शासनाच्या योजना
यावेळी अपघातग्रस्तांना विविध शासकीय योजनांमधून मिळणार्‍या आर्थिक व सामाजिक मदतीबाबतही माहिती देण्यात आली. सावदा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विशाल पाटील आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राहुल वाघ यांनी जखमी व्यक्तींना मिळणार्‍या विविध योजनांची माहिती देत नागरिकांना जागरूक केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला भुसावळ शहर निरीक्षक उद्धव डमाळे, तालुका निरीक्षक महेश गायकवाड, वरणगाव एपीआय अमित बागुल, मुक्ताईनगर निरीक्षक अशिषकुमार अडसूळ यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. नशिराबाद सहा. पोलीस निरीक्षक योगीता नारखेडे आणि हॉस्पिटलच्या टीमने कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

पोलीस अधीक्षकांची संकल्पना
पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून आज घेतलेल्या प्रशिक्षणामुळे पोलीस आणि महामार्गावरील व्यावसायिक खर्‍या अर्थाने ‘जीवनरक्षक म्हणून कार्य करतील, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !