जनजातीय संस्कृती समागमासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या : भुसावळसह उत्तर भारतासाठी अतिरिक्त सुविधा
नवी दिल्लीकडे वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय ; भुसावळ, मनमाड, पुणे, नागपूर मार्गावरील प्रवाशांना दिलासा
भुसावळ (23 मे 2026) : जनजातीय संस्कृती समागम कार्यक्रमासाठी नवी दिल्लीकडे जाणार्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे भुसावळसह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई विभागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भुसावळ, मनमाड, इटारसी, नागपूर, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट या महत्त्वाच्या स्थानकांमार्गे या गाड्या धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाने प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ ते हजरत निजामुद्दीन, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पटेल नगर, पुणे ते शकूर बस्ती तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते शकूर बस्ती या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. सर्व विशेष गाड्यांमध्ये 18 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान व गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असणार आहे. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने या विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे. रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कन्फर्म तिकीट मिळणे दूरापास्त झाले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. याच पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने निर्णय घेत नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.



भुसावळ-हजरत निजामुद्दीन विशेष
गाडी 01121 विशेष ही 22 मे रोजी भुसावळ येथून दुपारी 1.10 वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री 10.30 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल.परतीची गाडी 01122 विशेष ही 25 मे रोजी हजरत निजामुद्दीन येथून पहाटे 3.20 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 7.10 वाजता भुसावळ येथे पोहोचेल. या गाडीला नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, नागपूर, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट येथे थांबे देण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-पटेल नगर विशेष गाडी
गाडी 01055 विशेष ही 22 मे रोजी रात्री 10.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून तिसर्या दिवशी पहाटे 5.30 वाजता पटेल नगर येथे पोहोचेल.परतीची गाडी 01056 विशेष ही 24 मे रोजी रात्री 10.10 वाजता पटेल नगर येथून सुटून तिसर्या दिवशी पहाटे 5 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट येथे थांबे राहणार आहेत.
आणखी एक विशेष फेरी
गाडी 01057 विशेष ही 21 मे रोजी रात्री 10.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 6 वाजता पटेल नगर येथे पोहोचेल.परतीची गाडी 01058 विशेष ही 24 मे रोजी रात्री 11.30 वाजता पटेल नगर येथून सुटून तिसर्या दिवशी पहाटे 5.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.या गाडीला इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट येथे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-शकूर बस्ती विशेष
गाडी 01439 विशेष ही 22 मे रोजी पहाटे 4 वाजता पुणे येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 12.10 वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल. परतीची गाडी 01440 विशेष ही 25 मे रोजी पहाटे 2.30 वाजता शकूर बस्ती येथून सुटून दुसर्या दिवशी सकाळी 11.10 वाजता पुणे येथे पोहोचेल.या गाडीला अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट येथे थांबे राहणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-शकूर बस्ती विशेष
गाडी 01059 विशेष ही 21 मे रोजी सकाळी 5.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसर्या दिवशी दुपारी 2.30 वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल. परतीची गाडी 01060 विशेष ही 25 मे रोजी रात्री 12.10 वाजता शकूर बस्ती येथून सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी आणि आग्रा कॅन्ट येथे थांबे देण्यात आले आहेत.







