चिमुकलीच्या प्रामाणिकपणाची ‘सुवर्ण’ भरारी ! स्विमिंग पूलमध्ये सापडलेली 50 हजारांची सोन्याची चैन केली परत

भुसावळातील रिद्धी सरोदेच्या प्रामाणिकपणाचे शहरभर कौतुक


भुसावळ (25 मे 2026) : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात प्रामाणिकपणाचे दर्शन क्वचितच घडते मात्र भुसावळ शहरातील एका आठवीत शिकणार्‍या चिमुकलीने आपल्या प्रामाणिकपणाने संपूर्ण शहराची मने जिंकली आहेत.

विकास कॉलनी येथील रहिवासी असलेली रिद्धी नरेंद्र सरोदे हिला स्विमिंग पूलमध्ये तब्बल 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन सापडली मात्र मोहाला बळी न पडता तिने ती चैन संबंधित मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला.



पाण्यात चमकली सोन्याची चैन
उन्हाळ्याच्या सुटीमुळे जळगाव रोड परिसरातील ‘वसंत विहार’ येथील ‘जी.डी. स्पोर्ट्स’च्या स्विमिंग पूलमध्ये मोठी गर्दी होत आहे. याचदरम्यान नरवीरसिंग रावळ हे पोहत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पाण्यात निसटली. ही बाब त्यांच्या लक्षात न आल्याने चैन पूलच्या तळाशी पडून राहिली. त्याचवेळी पोहण्यासाठी आलेल्या रिद्धी सरोदेच्या नजरेस ती चैन पडली. क्षणाचाही विलंब न करता रिद्धीने ती चैन बाहेर काढली.

समजूतदारपणा दाखवत मालकाचा शोध
रिद्धीने प्रथम पूल परिसरात संबंधित मालकाचा शोध घेतला. मात्र, कुणीही दावा न केल्याने तिने ती चैन तात्काळ स्विमिंग कोच अक्षय कोळी यांच्या स्वाधीन केली. नंतर कार्यालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून खात्री झाल्यानंतर चैन मूळ मालक नरवीर सिंग रावळ यांना सुपूर्द केली.

बक्षीस नाकारले ; प्रेमापोटी स्वीकारले
रिद्धीच्या प्रामाणिकपणाने भारावून गेलेल्या नरवीरसिंग रावळ यांनी तिला रोख बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे माझे कर्तव्य होते, असे सांगत रिद्धीने नम्रपणे बक्षीस घेण्यास नकार दिला. अखेर प्रेमाग्रहामुळे तिने ते स्वीकारले.

शहरभरातून कौतुकाचा वर्षाव
मोबाईल, पैसे आणि मौल्यवान वस्तू हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना रिद्धीने दाखवलेला प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या गौरवास्पद कृतीबद्दल स्विमिंग पूलचे संचालक देविदास पाटील, नरेंद्र सरोदे, स्वप्निल पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवरांनी तिचा विशेष सन्मान केला. भुसावळातील या चिमुकलीच्या प्रामाणिकपणाची सध्या सर्वत्र अभिमानाने चर्चा होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !