बकरी ईद शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करा : भुसावळ पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले

शांतता समिती बैठकीत प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना ; नियमांचे पालन करण्याचे आवाह


भुसावळ (25 मे 2026) : आगामी बकरी ईद सण शांततेत, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून साजरा करावा, असे आवाहन डीवायएसपी केदार बारबोले यांनी केले. शहरातील हिरा हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस पालिका अधिकारी, धार्मिक प्रतिनिधी तसेच विविध समाजघटकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत बकरी ईद सणादरम्यान घ्यावयाच्या खबरदारी, कायदेशीर नियम आणि प्रशासनाच्या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अधिकृत ठिकाणीच कुर्बानी करण्याचे निर्देश : गोवंशीय प्राण्यांच्या कुर्बानीवर पूर्ण बंदी
बैठकीत कुर्बानीसंदर्भातील कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पालिका किंवा स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच कुर्बानी करावी, असे स्पष्ट करण्यात आले.



गोवंशीय प्राण्यांच्या कुर्बानीवर कायद्यानुसार पूर्ण बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला. मोठ्या प्राण्यांच्या वाहतुकीसाठी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे आरोग्य प्रमाणपत्र व खरेदी पावती बाळगणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. संघटित गोतस्करी प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गतही कारवाई होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

उघड्यावर मांस व कचरा टाकू नये : स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशासनाचा इशारा
स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्राण्यांचे अवशेष, रक्त अथवा कचरा सार्वजनिक ठिकाणी किंवा गटारात टाकू नये, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी पालिका प्रशासनाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कुर्बानीची जागा सार्वजनिक नजरेपासून दूर राहील यासाठी पडदा व्यवस्था करावी तसेच मांसाची वाहतूक उघड्या वाहनातून करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत : सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य टाळावे, असे प्रशासनाने सांगितले. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा वादग्रस्त संदेश प्रसारित करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. ईदगाह व मशिदी परिसरात गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

नमाजासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
संशयास्पद प्रकार तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन
नमाज पठणाच्या वेळा पूर्वनियोजित करून त्याची माहिती पोलिसांना देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तात्काळ पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले. या बैठकीला डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डमाळे तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !