यावलच्या 14 वर्षीय खेळाडूने नाशकात एक दिवसीय सामन्यात बनवल्या 258 धावा
यावल (31 मे 2026) : यावल शहरातील आयेशा नगरातील रहिवासी तथा सध्या नाशिकस्थित 14 वर्षाखालील क्रिकेट संघात खेळत असलेल्या मोहंमद तहा या मुलाने नासिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेत खेळतांना पुणे संघाविरूध्द 258 धावांची खेळी करीत विक्रम रचला. प्रथम फलंदाजी करतांना नाशिक संघाने 543 धावा केल्या व हा सामना त्यांनी जिंकला. यात सामनावीर म्हणून मोहंमद तहा यास गौरवण्यात आले.
यावलच्या विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव
शहरातील आयेशा नगरातील रहिवाशी जावेद खान सर यांचा मुलगा मोहम्मद तहा हा नाशिक शहरात शिक्षण घेत आहे व तो तेथे आरव्ही स्पोर्ट्स क्रिकेट संघात खेळतो. नुकतेच शुक्रवारी नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर नाशिक विरूध्द पुुणे असा 14 वर्षाखालील सामना पार पडला. या सामन्यात नाशिक संघाने प्रथम फलंदाजी केली. यात मोहमंद तहाने 169 चेंडूत 258 धावा करीत तो नाबाद राहिला. यामध्ये त्याने 43 चौकार आणि दोन षटकार लगावले.
या सामन्यात नाशिक संघाने एकूण 543 धावा केल्या. प्रत्युत्तरात पुण्याचा संघ हा केवळ 60 धावांवरच गारद झाला. या सामन्याचा सामनावीर हा मोहमंद तहा ठरला. यावलसारख्या लहानशा शहरातील या मुलाने नाशिक येथे क्रिकेट अॅकॅडमी तसेच शालेय शिक्षण घेतांना क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली.
