विद्येच्या माहेरघरातही कॉर्पोरेट जिहाद ः आयटी कंपनीतील महिलेवर धर्मांतरासाठी छळ


पुणे (4 जून 2026) : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणानंतर पुण्यातूनही धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आयटी कंपनीत काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याला इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने मानसिक त्रास देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या अन्यायाविरुद्ध दाद मागितल्यावर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तिच्या लॅपटॉपचा ताबा (स्क्रीन कंट्रोल) घेत आणि नकळत तिचा परस्पर राजीनामा दाखल करून तिची नोकरी हिरावली.

पीडीतेने माध्यमांपुढे मांडली व्यथा
पीडित महिलेने पत्रकार परिषदेत स्वतःवर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगाची आपबीती मांडली. ती या मोठ्या कंपनीत काम करत असताना तिच्याच टीममधील एका महिला सहकार्‍याने तिला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. ओळखीच्या एका मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावेत आणि स्वतःचा हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारावा, यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. परदेशात ऐषोआरामात राहण्याचे आमिषही तिला दाखवण्यात आले. मात्र, तिने या सर्व गोष्टींना ठामपणे नकार दिला.

न्याय मिळण्याऐवजी निराशाच
या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडितेने कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पण न्याय मिळण्याऐवजी तिची घोर निराशा झाली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आणि एचआर कमिटीच्या सदस्यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घातले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एका ऑनलाइन मीटिंगदरम्यान एचआर प्रतिनिधीने तिचा लॅपटॉप कंट्रोलमध्ये घेतला आणि परस्पर तिचा राजीनामा कंपनीला सादर केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा चौकशीशिवाय तिला थेट कामावरून कमी करण्यात आले. सध्या या प्रकरणी हिंजवडी पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, संबंधित मोठ्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकलेला नाही.

नुकसान भरपाई आणि कारवाईची मागणी
नोकरी व सन्मान हिरावल्याने खचलेल्या या महिलेने कायदेशीर लढा उभारला आहे. तिने वकिलांमार्फत संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. बळजबरीने घेतलेला हा बेकायदा राजीनामा रद्द करून पूर्ण वेतनासह तिला पुन्हा नोकरीवर घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मानसिक त्रासाबद्दल 50 लाखांची नुकसानभरपाई व कंपनीने लेखी माफी मागावी, असेही नोटीसीत नमूद केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !