यावल शहर व तालुक्याला वादळी पावसाचा फटका : केळीचे नुकसान ; अनेक घरांवरील पत्रे उडाले
वृक्ष कोसळल्याने भुसावळ मार्ग साडेतीन तास तर फैजपूर मार्ग तासभर ठप्प
यावल (7 जून 2026) : यावल शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस दाखल झाला. यामध्ये वादळी वार्याने यावल शेत शिवार, चितोडा, सांगवी, डोंगरकठोरा, अंजाळे, निमगाव, टेंभी, राजोरा या परिसरातील केळी पिकं अक्षरशः उध्वस्त केली. यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळेपासून ते यावलपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष कोसळल्याने तब्बल साडेतीन तास वाहतूक ठप्प झाली. यावल-फैजपूर रस्तादेखील हा तासभर बंद पडला.
केळीला वादळाचा फटका
वादळी पावसात अनेक घरांवरील पत्रे उडाले व अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. यावल शहर व तालुक्यात शनिवारी वादळी वार्यासह पाऊस दाखल झाला. या पावसामुळे राजोरा शिवारातील सतीष रूपचंद पाटील यांच्या शेतातील पाच हजार केळी खोड जमीनदोस्त झाले. निमगाव शेत गट क्रमांक 44 मधील उज्वला कैलाससिंग पाटील यांचे तीन हजार 300 केळीचे खोड, निमगाव शेत गट क्रमांक 113 मधील कैलाससिंग नयनसिंग पाटील यांचे एक हजार केळी खोडासह या भागातील शेती क्षेत्रात अनेक शेतकर्यांची केळी थेट जमीनदोस्त झाली. याच पद्धतीने यावल शहर शेत-शिवार, चितोडा शेत-शिवार, सांगवी, डोंगरकठोरा शेतशिवारातदेखील केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. कापणीयोग्य केळी जमीन-दोस्त झाली.
यावल-भुसावळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प
या वादळामुळे यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोठे वृक्ष कोसळले. त्याचप्रमाणे यावल-निमगाव दरम्यान देखील वृक्ष कोसळल्याने यावल-भुसावळ रस्ता हा साडेतीन तास ठप्प होता.दोन्ही बाजूने मोठ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या वतीने रस्त्यावर कोसळलेले वृक्ष हटवण्याचे काम लगबगीने सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर यावल ते चितोडा दरम्यान वृक्ष कोसळल्याने तासभर रस्ता बंद पडला. या मार्गावरील पडलेले वृक्ष हटवण्याचे काम नॅशनल हायवे अथोरिटी च्या वतीने करण्यात आले.
अंजाळे गावात घरावरील पत्रे उडाले
अंजाळे या गावातील जुना कोळी वाडा भागातील ज्ञानेश्वर नामदेव सपकाळे यांच्या घरावरील पत्रे उडाली तर प्लॉट परिसरातील विनोद प्रकास सपकाळे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने कुटुंब उघाड्यावर आले. अंजाळे गावात विद्युत वितरण कंपनीचे आठ खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला.



