भुसावळातील टवाळखोरांचा दामिनी पथक करणार बंदोबस्त : शाळा-महाविद्यालय परिसरात धडक मोहिम


भुसावळ (15 जून 2026) :  जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने विशेष धडक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

टवाळखोरांवर आता पथकाचा वॉच
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच बसस्थानक परिसराला भेटी दिल्या. यावेळी पथकाने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या तसेच सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.



शाळा-महाविद्यालयाच्या आवारात गस्त
बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे व त्यांच्या पथकाने शाळा-महाविद्यालय परिसरात उपस्थित राहून विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करत त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणार्‍या तसेच विद्यार्थ्यांना त्रास देणार्‍या व्यक्तींवर वचक बसावा यासाठी विशेष गस्त घालण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी उपलब्ध असलेल्या पोलीस हेल्पलाईन क्रमांकांची तसेच तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देऊन जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि समाजात सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !