श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री झेंडूजी महाराज बेळीकर मठात भागवत सप्ताह
भुसावळ (20 जून 2026) : अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री झेंडूजी महाराज बेळीकर मठात श्री गीतादास चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी आयोजित केलेला श्रीविठ्ठल नामजप, श्रीमद् भागवत कथा सप्ताह व पंढरी महात्म्य सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सप्ताह सोहळ्यात सुमारे 200 भाविकांनी सहभाग घेऊन आध्यात्मिक लाभ घेतला. सोहळ्यादरम्यान दररोज एक तास सामूहिक श्रीविठ्ठल नामजप व नामचिंतन करण्यात आले. अधिक मासाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व यावेळी विषद करण्यात आले.
पंढरपूरच्या वैभवाचे चिंतन
पंढरी महात्म्याच्या निरूपणातून भगवान पांडुरंग विटेवर कसे प्रकट झाले, भक्त पुंडलिकराय यांचे जीवनकार्य, माता चंद्रभागेचे महत्त्व आणि संतांनी अभंगातून वर्णन केलेल्या पंढरपूरच्या वैभवाचे चिंतन करण्यात आले.



कथांचे सादरीकरण
यावेळी श्रीहभप गीतादास चंद्रकांत महाराज साकरीकर (आळंदी साधक) यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीमधून दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत श्रीमद् भागवत महापुराण कथा सादर करण्यात आली. कथेमध्ये भागवत महात्म्य, सृष्टी निर्मितीचे वर्णन, कपिल संवाद, प्रल्हाद चरित्र, भगवान श्रीकृष्णांच्या बाल व नटखट लीला तसेच भागवतधर्माचे महत्त्व यांचे प्रभावी विवेचन करण्यात आले.
संतपरंपरेचा संदेश पोचवला
अधिक मासात श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रीविठ्ठल नामजप, भागवत कथा आणि पंढरी महात्म्याच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्माची गोडी लावण्याचे कार्य श्रीहभप गीतादास चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. विठ्ठल भक्ती, भागवत धर्म आणि संतपरंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे हे कार्य खर्या अर्थाने स्तुत्य व अनुकरणीय आहे.

