भुसावळात योगोत्सव 2026 उत्साहात : सामूहिक शंखनादाने रामानंद लॉन्स दुमदुमले

अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओच्या आयोजनातून जागतिक योग दिनानिमित्त योग, प्राणायाम आणि ध्यानाचा अनोखा संगम


‘Yogotsav 2026’ Celebrated with Enthusiasm in Bhusawal: Ramanand Lawns Resounds with Collective Conch-Shell Blowing भुसावळ (21 जून 2026) : जागतिक योग दिनानिमित्त अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओ आयोजित ‘योगोत्सव 2026’ हा भव्य कार्यक्रम शहरातील रामानंद लॉन्समध्ये अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि संगीतमय वातावरणात झाला. यावेळी भारत सरकारतर्फे प्रसारित करण्यात आलेला अधिकृत योगा प्रोटोकॉल राबविण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित साधकांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचा लाभ घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.

सामूहिक योगाभ्यासाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील यांनी शंखनादाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, शंखनाद केल्याने प्राणायामाचा लाभ तर होतोच, शिवाय परिसरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे मनातील आणि आसपासची नकारात्मकता दूर ठेवता येते.




भारतीय संस्कृतीचे योगस्त्र जगभरात पोहोचण्यात योगदान : रजनी सावकारे
प्रमुख अतिथी व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची विशेष उपस्थिती दिली व मार्गदर्शन करताना यांनी भारतीय योगपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. महर्षी पतंजली, परमपूज्य श्री श्री रविशंकरजी तसेच अनेक संत-महात्म्यांनी भारतीय संस्कृती आणि योगशास्त्र जगभर पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे पुढे नेले जात आहे. निरोगी आणि आनंदी वृद्धत्वासाठी प्रत्येकाने योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे, असे प्रतिपादन रजनी सावकारे यांनी केले.

योगोत्सवात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक कुणाल महाजन यांनी शरीर संचालनाचे विविध प्रकार करून घेतले. त्यानंतर अद्वैतानंद योगा अँड फिटनेस स्टुडिओच्या संचालिका प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील यांनी उपस्थितांना अधिकृत योगा प्रोटोकॉलचे मार्गदर्शन केले. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील यांनी घेतलेल्या ध्यानसत्राने उपस्थित साधक मंत्रमुग्ध झाले.

सामूहिक शंखनादाने संपूर्ण परिसर दुमदुमला
कार्यक्रमाच्या शेवटी अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओच्या वतीने आयोजित सामूहिक शंखनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या अनोख्या शंखध्वनीने योग, अध्यात्म आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देत ‘योगोत्सव 2026’ ची उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमात विविध वयोगटातील साधकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत योगाविषयीची जागरूकता आणि उत्साह व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम सकारात्मक ऊर्जा, शिस्तबद्ध आयोजन आणि सामूहिक सहभागामुळे संस्मरणीय ठरला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !