जानेवारी 2026 पासून दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळेना ! भुसावळातील प्र.ह.दलाल यांची माहिती
भुसावळ (23 जून 2026) : नाशिक येथील डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे नाशिकसह परिसरातील असंख्य विविध व्याधी ग्रस्त आबालवृद्धांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्याचे रिपोर्ट व इतर आवश्यक ती कागदपत्रे सादर करून सहा महिन्यांचा प्रदीर्घ काळ उलटून देखील प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक दिव्यांग त्रस्त झाले असल्याचे भुसावळातील शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी कळवले आहे.
सर्वर बंद असल्याची अडचण
मुख्य वैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क साधला असता जानेवारी 2026 पासून ऑनलाईन कागदपत्रे पुढे सबमिट होत नाही, सर्व्हर बंद आहे, अशी उत्तरे मिळतात. वास्तविक राज्यात रुग्णांचे हक्क आणि लोकसेवा हमी कायदा अस्तित्वात असून कोणतेही काम ठराविक मुदतीत व्हायला हवे अन्यथा संबंधित व्यक्तीवर कारवाई होईल, अशी तरतूद आहे मात्र हे सर्व कागदावरच आहे की काय अशी शंका येते.

सहा महिने होऊनही प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांसाठी प्रवेश अर्ज, परीक्षेचे आवेदनपत्र, नोकरीसाठी दिव्यांगाचा पुरावा आदी अनेक काम अडून पडली आहेत. वेळेवर प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल पण शासनाचे अधिकारी मात्र काहीही करायला तयार नाहीत. गतिमान प्रशासन ते हेच का? दिव्यांगांचा हा सरकारी छळ थांबणार कधी? असा प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

