भुसावळातील ‘माउली प्लाझा’मध्ये पाण्याची चोरी : माहिती अधिकारात बाब उघड
नगरपरिषदेच्या नाकाखाली विद्युत मोटर लावून पाण्याची चोरी : कारवाईकडे लागले लक्ष
भुसावळ (27 जून 2026) : ऐन उन्हाळ्यात भुसावळ शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य जनता पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत वणवण फिरत आहे. असे असताना, दुसरीकडे मात्र शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये आणि बांधकामांसाठी नगरपरिषदेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता राजरोसपणे पाणी चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मौजे भुसावळ येथील ‘माउली प्लाझा’ या इमारतीमध्ये भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीर डल्ला मारण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी मौजे भुसावळ सर्वे क्र. 115/1/अ, प्लॉट क्र. 9 (माऊली प्लाझा) या इमारतीमधील नळ कनेक्शनबाबत भुसावळ नगरपरिषदेकडे माहिती अधिकारांतर्गत (ठढख) माहिती मागवली होती. यावर जन माहिती अधिकार्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात या इमारतीसाठी पाणी पुरवठा विभागाकडे कोणत्याही अधिकृत नळ जोडणीची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेच 2013 पासून आजतागायत या कनेक्शनपोटी नगरपरिषदेकडे एक रुपयाचाही कर भरण्यात आलेला नाही, सर्व नोंदी ’निरंक’ आहेत.


विद्युत मोटर लावून पाण्याचा उपसा!
नगरपरिषदेच्या कागदपत्रांवर हे कनेक्शन अस्तित्वातच नसले, तरी प्रत्यक्ष जागेवर मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे नळ जोडणी करून थेट विद्युत यंत्र (मोटर) बसवण्यात आली असून त्याद्वारे हजारो लिटर पाण्याचा उपसा सुरू आहे. प्रत्यक्ष जागेवरील छायाचित्रांमुळे (जीपीएस लोकेशनसह) हा चोरीचा प्रकार रंगेहात पकडला गेला आहे.
प्रशासनाचा महसूल बुडाला, दोषींवर गुन्हे कधी?
एकीकडे प्रामाणिक कर भरणारे भुसावळकर पाशवी पाणीटंचाईचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे बिल्डर आणि रॅकेट चालवणार्यांकडून प्रशासनाला चुना लावला जात आहे. अधिकृत मंजुरी नसताना ही विद्युत मोटर आणि पाईपलाईन कोणी जोडली? पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष का होते? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
कारवाई न झाल्यास आंदोलन
हा थेट भुसावळ नगरपरिषदेच्या मालमत्तेवर पडलेला दरोडा असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून सदर अनधिकृत कनेक्शन तात्काळ कापण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील म्हणाले.
आता या उघड झालेल्या पाणी चोरीवर भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी प्रशासन काय कडक कारवाई करते, याकडे संपूर्ण भुसावळकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
