शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत मंगरूळ शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केले शैक्षणिक साहित्य
अमळनेर (28 जून 2026) : अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित स्व.आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्याने आई, शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत 100 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मोफत वाटप केले.
राहुल मधुकर कुंभार हा मंगरूळ शाळेचा माजी विद्यार्थी असून मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यात समानता निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप केले.


आई ही आयुष्याचा पहिला गुरू असतो त्यानंतर शाळेतील शिक्षक मूल्ये आणि संस्कार रुजवत असतात त्यांच्या शिकवण्याने आणि शिस्तीने आज मोठा व्यावसयीक झालो असून त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही मात्र त्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे म्हणून आई वजाबाईच्या नावाने मुलांना दप्तर वाटप केले आहे.
मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी दाते राहुल मधुकर कुंभार याचा तर संस्थाचालक पियुषा पाटील यांनी त्याची आई वजाबाई कुंभार यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गावातील जेष्ठ नागरिक कैलास कुंभार, लोटन बाबुराव कुंभार, लोटन रघुनाथ कुंभार, धुडकू कुंभार, समाधान कुंभार, पंकज पाटील, शत्रुघ्न पाटील या प्रमुख अतिथींच्या हस्ते मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, राहुल पाटील, सीमा पाटील उपस्थित होत्या.
मूल्ये आणि संस्कारांचा र्हास होत असतानाही ग्रामीण भागातील राहुल सारख्या विद्यार्थ्यांच्या अंगी शाळा-शिक्षक आणि आपल्या आईच्या प्रति कृतज्ञता आणि दातृत्व टिकून आहे याचा अभिमान वाटतो, असे उपशिक्षक संजय पाटील म्हणाले.
शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. युवक कल्याण प्रतिष्ठानतर्फे 100 वक्त्यांपैकी अनिता संदानशीव यांनी मंगरूळ येथे व्याख्यान देऊन शाहू महाराजांचे कार्य विशद केले. त्यांनी गीतही सादर केले. आभार संजय पाटील यांनी मानले.
