भुसावळात ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ शुभारंभ
भुसावळ (1 जुलै 2026) : ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघा’च्या वतीने समाजात भक्ती आणि सकारात्मक उर्जेचा प्रसार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकारातून अत्यंत सात्विक ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाची’ अधिकृत स्थापना मंगळवार, 30 जून 2026 रोजी करण्यात आली. या मंडळाचा पहिला जाहीर सुंदरकांड पठण सोहळा देखील उत्साहात पार पडला.
दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांचा ‘श्रीश्गणेशा’
वय हे केवळ एक आकडा असतो आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हेच या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मंडळातील 15 ते 20 ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनी दररोज एकत्र येऊन अत्यंत निष्ठेने सुंदरकांड पठणाचा सराव करत आहेत. सर्व श्लोक, चौपाया आणि त्यांचे सुश्राव्य गायन याचा परिपूर्ण सराव आता पूर्ण झाला आहे. या साधनेचा ‘प्रथम श्रीगणेशा’ जाहीरपणे मंगळवारी संघाचे संयोजक डॉ.नितु पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला.


स्थापना दिन आणि पहिला भव्य सोहळा
मंगळवारी ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ अधिकृत स्थापना दिन साजरा करण्यात आला. या सुवर्ण मुहूर्तावर मंडळाचे पहिले जाहीर सुंदरकांड पठण ‘ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांच्या निवासस्थानी झाले. हनुमंत रायाच्या पराक्रमाचे आणि भक्तीचे गुणगान गाणारा हा सोहळा संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण करेल, यात शंका नाही. सुंदरकांडाचे सामूहिक पठण ऐकणे आणि त्यात सहभागी होणे हे मनाला शांतता आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा देणारे ठरते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जनी मंडळ सहकारी सतीश जंगले, पी.जी.पाटील, गणेश सरोद, मिलिंद कोल्हे, दिलीप मराठे, प्रभाकर झांबरे, प्रमोद बोरोले, अशोक नेहते, जी.डी.सरोदे, भास्कर खाचणे, रमेश पाटील, संजीव चौधरी, संजय भारंबे, सुनील सूर्यवंशी, एच.पी.महाजन आदी उपस्थित होते. या मंगलमय प्रसंगी गणेश कॉलनी परिसरातील सर्व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विवेक पाटील, भाग्येश चौधरी, राजेश वारके, नरेंद्र नेमाडे, वेदांत पाटील, तारुष ढाके, दुर्वांग पाटील यांनी परिश्रम घेतले.
