मालोदच्या तत्कालीन ग्रामसेवकाविरोधातील तक्रारीची गंभीर दाखल : ग्रामसेवक नियुक्ती आदेश केला रद्द
यावल (3 जुलै 2026) : यावल तालुक्यातील मालोद या पेसांतर्गत येणार्या ग्रामपंचायतीतील तत्कालीन कंत्राटी ग्रामसेवक यांच्या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गंभीर दखल घेतली. तक्रारीवरून सुनावण्या घेत सदर ग्रामसेवकाचा नियुक्ती आदेश रद्द केला आहे व त्यास सेवामुक्त करण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
मालोद, ता.यावल ही पेसा अंतर्गत येणारी ग्राम पंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये विजय गंगाराम बारेला हे कंत्राटी ग्रामसेवक पदावर नियुक्त होते. दरम्यान ते सातत्याने ग्रामपंचायतीत गैरहजर राहायचे आणि त्यांच्या असमाधानकारक कामकाज आणि गैरवर्तणुकीबाबत सरपंच रमाबाई बारेला व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदच्ेया मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे वेळोवेळी या संदर्भात सुनावण्या घेण्यात आल्या तसेच यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडून देखील अहवाल मागवण्यात आला.

नियुक्ती अखेर रद्द
यात बारेला यांच्या कामकाजामध्ये सुधारणा होत नसल्याचे अहवालातून समोर आले. कंत्राटी ग्रामसेवक बारेला यांना थेट त्यांचा नियुक्ती आदेश रद्द करीत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश 29 जुन रोजी काढण्यात आले. ते गुरुवारी मालोद सरपंच यांना प्राप्त झाले. तत्पूर्वी ग्रामसेवक बारेला यांना कार्यालयीन सेवा समाप्तीची नोटीस देखील बजावण्यात आली होती व आता त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले.
