भुसावळातील भोई नगर परिसरात एसआयआर अंतर्गत ईएफ फॉर्मचे वाटप व मतदार जनजागृती
भुसावळ (4 जुलै 2026) : शहरातील भोई नगर परिसरात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांना ईएफ फॉर्मचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नगरसेविका शारदा दीपक धांडे व माजी नगरसेवक दीपक काशिनाथ धांडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
अचूकपणे फार्म भरण्याबाबत मार्गदर्शन
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तेजेंद्र महाजन यांनी मतदारांना 2002 पूर्वीच्या नोंदी, प्रोजेनी मॅपिंग, सेल्फ मॅपिंग तसेच एसआयआरचा ईएफ फॉर्म कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि फॉर्म अचूकपणे कसा सादर करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक मतदाराची लोकशाहीप्रती महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने ईएफ फॉर्म स्वतः तपासून, योग्य माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांसह वेळेत जमा करावा, असे आवाहन करण्यात आले. फॉर्म वेळेत जमा झाल्यानंतर त्याचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून, भविष्यात मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांचा मोहिमेत सहभाग
या उपक्रमात सहाय्यक शिरीष कोल्हे, कविता चौधरी आणि मीरा कुंदप यांनीही मतदारांना फॉर्म भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य ओळखून ईएफ फॉर्म अचूक भरून वेळेत जमा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
