भुसावळात उत्साहात निघाली श्री राम कथेची भव्य कलश यात्रा

सात दिवसीय सोहळ्याला प्रारंभ : मुसळधार पावसातही भाविकांमध्ये उत्साह संचारला


भुसावळ (7 जुलै 2026) : भुसावळ शहरातील लक्ष्मी व्यंकटेश बालाजी मंदिरात आजपासून मंगळवार, 7 जुलैपासून प्रभू श्रीराम कथेला अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. ही कथा 7 जुलै ते 13 जुलै अशी सलग सात दिवस चालणार आहे.

दररोज दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत भाविकांना या कथेचा लाभ घेता येणार आहे. कथेच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्याहस्ते व्यंकटेश बालाजी मंदिरात ‘श्री मदन मोहनजी महाराज’ (जयपूर, राजस्थान) यांच्या पावन उपस्थितीत ग्रंथाची (पोथी) विधिवत पूजा-अर्चा व आरती करण्यात आली.

सजीव देखावा आणि संगीतमय भक्तीगीते
पोथी पूजनानंतर लक्ष्मी चौकातील पुरातन श्रीराम मंदिरापासून भव्य कलश यात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि भक्त हनुमान यांचा विलोभनीय सजीव देखावा (आरास) सादर करण्यात आला होता. हा देखावा सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरला. वाजत-गाजत आणि डीजेचा कर्कश आवाज न करता संगीतमय भक्तीगीतांवर थिरकत शेकडो भाविकांनी भर पावसातही या कलश यात्रेचा आणि आनंदोत्सवाचा आनंद घेतला.

51 महिलांचा सहभाग
शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मंगलमय कलश यात्रेत 51 सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण केले होते. मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. धार्मिक सोहळ्याप्रसंगी मुख्य यजमान रजनी सावकारे, राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, मयूर नागोरी, गोटू लाहोटी, गोविंद हेडा, राजेश लढ्ढा, दीपक काबरा, राजीव चांडक, सोना काबरा, मीना अग्रवाल, विना लाहोटी, अयोध्यादेवी मंत्री, प्रिया अग्रवाल, निर्मला चौधरी यांच्यासह शहरातील इतर शेकडो आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सात दिवस चालणार्‍या या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !