यावल शहरात मुस्लिम बहुल भागात एसआयआर संदर्भात विशेष शिबिर
यावल (8 जुलै 2026) : यावल शहरातील मुस्लिम बहुल भागात उपनगराध्यक्ष तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून एसआयआर संदर्भात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. बीएलओंना एकत्रीत या ठिकाणी बोलवण्यात आले आणि नागरिकांमध्ये एसआयआर संदर्भात जनजागृती करून शहरातील विविध भागातील नागरिकांकडून एसआयआर संदर्भातील कागदपत्र संकलीत करून त्यांचे अर्ज देखील भरून घेण्यात आले.
आवश्यक कागदपत्रे सादर करणे सोयीचे
एकत्रीत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मतदारांना एकाच ठिकाणी येऊन आपली आवश्यक कागदपत्र सादर करून फॉर्म भरणे सोयीचे होत आहे. यावल शहरात मुस्लिम बहुल भागामध्ये यावलच्या उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकूब, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो.हकीम मो. याकूब, नगरसेवक शेख निसार अब्दुल हमीद मोमीन यांच्या माध्यमातून एसआयआर संदर्भात विशेष शिबिर घेण्यात येत आहे.

चार दिवस विविध ठिकाणी शिबिर
शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत चार दिवस विविध ठिकाणी हे शिबिर घेतले जात असून या शिबिरामध्ये मंडप टाकुन बीएलओंना बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मतदार याद्यांची उपलब्धता आणि एसआयआरसाठी मतदारांना काय-काय कागदपत्र लागतील ? या संदर्भात मार्गदर्शन करून नागरिकांचे एसआयआर संदर्भातील अर्ज भरण्यात येत आहे. एकाच मंडपात आवश्यक ते सर्व कागदपत्र घेऊन बीएलओंकडे मतदार आल्यानंतर त्यांची योग्य माहिती एसआयआर च्या फॉर्म च्या माध्यमातून भरली जात आहे. शहरातील विविध भागात एस आय आर संदर्भातील कार्यवाही वेळेत आणि पारदर्शकरित्या पार पाडली जावी यासाठी उपनगराध्यक्ष, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
एस.आय.आर संदर्भातील कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी प्रत्येक मतदाराला पासपोर्ट साईज फोटो देखील बीएलओ यांना द्यावे लागत आहे. मतदारांनी आपले पासपोर्ट फोटो तयार ठेवावे आणि आवश्यक ती माहितीच्या माध्यमातून अर्ज भरून घ्यावे आणि या कामाकरिता बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष मो.हकीम मो.याकूब यांनी केले आहे.