माजी मंत्री विजयकुमार गावीत यांच्या नावाने बनावट लेटरहेडद्वारे नऊ कोटींच्या निधीचा गैरवापर : माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांविरुद्ध गुन्हा
बनावट स्वाक्षरी, शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून निधी वळवल्याचा आरोप : आरोपींचा शोध सुरू
Misuse of ₹9 crore in funds using a forged letterhead in the name of former Minister Vijaykumar Gavit: Case registered against four individuals, including former MLA Shirish Chaudhari नंदुरबार (11 जुलै 2026) : आदिवासी विकास विभागाच्या विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या शासकीय निधीपैकी तब्बल नऊ कोटी रुपयांचा निधी बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षरी आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून अन्य कामांकडे वळविल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी (सर्व रा.नंदुरबार) व किशोर तुळशीराम पाटील (रनाळे) तसेच इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
माजी मंत्री गावीत यांचे कार्यालयीन काम पाहणारे शहर भाजपा कार्यालयप्रमुख अशोक शिवाजी बेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे नंदुरबार शहर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 665/2026 दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितामधील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासकीय नोंदींमध्ये फेरफार करणे, कट रचणे आदी गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बनावट लेटरहेडवरून निधी वळवल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी 2022 ते 2024 या कालावधीत नंदुरबार शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले होते. यामध्ये जानेवारी, जून आणि ऑगस्ट 2024 मधील शासन निर्णयांद्वारे विविध कामांसाठी 9.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
चार बनावट लेटरहेड तयार केल्याचा आरोप
माजी मंत्री गावीत हे आजारी असताना 18 ऑगस्ट 2025 ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत संशयीत आरोपींनी आमदार विजयकुमार गावीत यांच्या नावाचे 18 ऑगस्ट 2025, 15 नोव्हेंबर 2025 व 5 जानेवारी 2026 रोजीचे दोन असे एकूण चार बनावट लेटरहेड तयार करून त्यावर तत्कालीन मंत्री गावीत यांच्या बनावट स्वाक्षर्या करून ते मंत्रालयात सादर केले. त्याआधारे शासन निर्णयांमध्ये सुधारणा करून सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी शासनाची दिशाभूल करून अन्य कामांसाठी वळविण्यात आला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
स्वतःच्या फायद्यासाठी निधी वळवल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, आरोपींनी आर्थिक व राजकीय लाभ मिळविण्याच्या उद्देशाने हा कट रचला. वळविण्यात आलेल्या निधीपैकी सुमारे 2 कोटी रुपयांची कामे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे वडील कै.हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान व सभागृह उभारणीसाठी प्रस्तावित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
माजी आमदारांवर यापूर्वीही गुन्हे
पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सहआरोपी गौरव चौधरी व नयन चौधरी यांच्याविरुद्धही विविध गुन्हे नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नयन दिलीप चौधरी यांना यापूर्वी जिल्हाबंदीची कारवाईही करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भाटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांनी दिली आहे.
