भुसावळात ‘ताप्ती पब्लिक स्कूल’मध्ये चिमुकल्यांनी लुटला कृत्रिम पावसाचा आनंद


भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच बालमित्रांचा आवडता ’रॅनी डे’ (पाऊस दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पावसात भिजत चिमुकल्यांनी मनसोक्त डान्स केला आणि खेळांचा आनंद लुटला.

रंगीबेरंगी रेनकोट आणि कागदाच्या होड्या
या अनोख्या उपक्रमात नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजीचे तब्बल 300 ते 400 विद्यार्थी वेगवेगळ्या रंगांचे व डिझाईनचे रेनकोट घालून उत्साहाने शाळेत आले. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात कृत्रिम पावसाची विशेष व्यवस्था केली होती. हुबेहूब पडणार्‍या या पावसात बालगोपाळांनी मनमुराद आनंद घेतला. चिमुकल्यांसाठी प्लास्टिकच्या मोठ्या टबमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या रंगीबेरंगी कागदाच्या होड्या (बोटी) पाण्यात सोडून बालपणाचा आनंद लुटला.

गाण्यांवर थिरकले पाय आणि खेळले गेम
रॅनी डेच्या निमित्ताने पावसाच्या खास गाण्यांचे आयोजन करण्यात आले होते. कृत्रिम पावसाच्या धारांखाली संगीताच्या तालावर चिमुकल्यांचे पाय आपोआप थिरकले. डान्ससोबतच विद्यार्थ्यांनी पावसात विविध खेळांचा (गेम्स) आनंद घेतला. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या आनंदात सहभागी होत शाळेतील शिक्षकांनीही या पावसाचा मनोमुराद आनंद घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताप्ती पब्लिक स्कुलच्या प्रिन्सिपल निना कटलर, व्हा.प्रिन्सिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, स्मिता जाधव, व्हर्जिनिया बर्नड, स्मिता नन्नवरे, सोनिया दोबाल, सिसिलीया मैथ्यू, कियोना रॉड्रिक्स, क्रिस्टीना साबळे व चेतना झोपे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले व उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या पावसाळी आनंदोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !