यशाचा कोणताही शॉर्टकट नाही : भुसावळात मानसी फेगडे

‘पाहुणे आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन


There is no shortcut to success: Manasi Fegade in Bhusawal भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, वेळेचे योग्य नियोजन आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावरच यश प्राप्त करता येते, असे मौलिक विचार माजी विद्यार्थिनी तथा फिजिओथेरपिस्ट मानसी जयदीप फेगडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येणार्‍या ‘पाहुणे आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत त्या मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होत्या.

मोठी स्वप्ने पहा, जिद्दीने प्रयत्न करा
मानसी फेगडे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. संघर्षाला घाबरू नये आणि प्रत्येक अडचणीतून नवीन वाट निर्माण करण्याची तयारी ठेवावी. फिजिओथेरपिस्ट या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याचे महत्त्वही पटवून दिले. नियमित व्यायाम, योग्य बैठक पद्धती, संतुलित आहार, पुरेशी झोप, मोबाईलचा मर्यादित वापर तसेच अभ्यास करताना योग्य पोश्चर ठेवण्याची गरज याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते आणि उत्तम आरोग्य हेच यशस्वी शिक्षणाचे भक्कम आधारस्थान आहे, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून करिअर, उच्च शिक्षण, फिजिओथेरपी क्षेत्रातील संधी तसेच अभ्यासाचे नियोजन याविषयी शंकानिरसन करून घेतले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या हितगुजामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व योग्य दिशा मिळाली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक बी.बी.जोगी, कांचन राणे, नेहा पाटील, हेमलता जावळे, सुनीता जावळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !