भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा व अनधिकृत रेल्वे रुळ ओलांडण्याविरुद्ध व्यापक जनजागृती अभियान

एक छोटीशी निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो : सुरक्षित राहा, सतर्क राहा


भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रेल्वे रुळांवरील अनधिकृत वावर (ट्रेस पासिंग) रोखण्याच्या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांनी विभागातील विविध आरपीएफ पोस्टांच्या माध्यमातून गावे, शाळा, समपार फाटे तसेच इतर संवेदनशील ठिकाणी व्यापक जनजागृती अभियान राबविले.

या अभियानादरम्यान आरपीएफ अधिकारी व कर्मचार्‍यांनी नागरिकांना रेल्वे सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींविषयी मार्गदर्शन केले. रेल्वे रुळांवरून चालणे किंवा अनधिकृतपणे रुळ ओलांडणे, धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे तसेच प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या इतर कृत्यांमुळे होणार्‍या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी नागरिकांना केवळ पादचारी पूल (एफओबी), सब-वे तसेच अधिकृत रेल्वे समपार फाटकांचा वापर करण्याचे, लहान मुले व जनावरे रेल्वे रुळांपासून दूर ठेवण्याचे, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ आरपीएफला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

आरपीएफने नागरिकांना सांगितले की, रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश, रेल्वे रुळांवर ट्रेसपासिंग करणे, दगडफेक करणे तसेच रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणे हे रेल्वे अधिनियम तसेच जन विश्वास अधिनियम-2026 अंतर्गत दंडनीय गुन्हे असून अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येते.

जनजागृती अभियानासोबतच विशेष अंमलबजावणी मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रेल्वे अधिनियमाच्या कलम 147 तसेच जन विश्वास अधिनियम-2026 अंतर्गत 134 व्यक्तींवर कारवाई करून त्यांना दंड करण्यात आला. ही कारवाई रेल्वे परिसरातील अनधिकृत प्रवेश व ट्रेसपासिंगवर प्रभावी नियंत्रण ठेवून सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.

या अभियानाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी नागरिकांनी रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा तसेच सुरक्षित रेल्वे वातावरण निर्माण करण्यासाठी आरपीएफला सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !