भुसावळात श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानचा 29 वा ब्रह्मोत्सव उत्साहात
शहर झाले भक्तीमय : तीन दिवसीय धार्मिक उत्सवाची भव्य शोभायात्रेने सांगता
भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : शहरातील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भव्य ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट व श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ब्रह्मोत्सवाचे हे 29 वे वर्ष होते.
तीन दिवस महोत्सव
मंगळवार, 14 जुलै ते गुरुवार, 16 जुलै या तीन दिवसीय कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाविकांना अध्यात्मिक प्रेरणा देणारे स्वामी श्री केशवाचार्यजी महाराज व आशीर्वाद देणारे प.पू.युवराज स्वामीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.


महाअभिषेक आणि पूर्णाहुती
गुरुवारी सकाळी श्रीदेवी, भूदेवी सह श्री व्यंकटेश देवांचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने महाअभिषेक करण्यात आला. यानंतर प्रबंध पाठ आणि आरती संपन्न झाली. दुपारी 12 वाजता विधीवत ब्रह्मोत्सव व पूर्णाहुतीचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
भक्तिमय वातावरणात भव्य शोभायात्रा. ब्रह्मोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेली श्री लक्ष्मी व्यंकटेश देवी-देवतांची भव्य शोभायात्रा संध्याकाळी 4:30 वाजता वाजत-गाजत काढण्यात आली. श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान येथून सुरू झालेली ही शोभायात्रा अष्टभुजा देवी मंदिर, गंगाराम प्लॉट, मरीमाता मंदिर समोरून, लक्ष्मी चौक, राम मंदिर, सराफ बाजार आणि विठ्ठल मंदिर वार्ड मार्गे पुन्हा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात आली. येथे या भव्य शोभायात्रेचा समारोप झाला. संपूर्ण मार्गावर भगवंताच्या नामस्मरणाने वातावरण भक्तिमय झाले होते.
महाप्रसादाने सांगता आणि मान्यवरांची उपस्थिती
शोभायात्रेनंतर संध्याकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता झाली. या तीन दिवसीय सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, मिलिंद अग्रवाल, रामवल्लभ झवर, जे.बी.कोटेचा,राजेश चांडक,मधूलता शर्मा, दीपक काबरा, गोपाल राठोड, जी.आर. ठाकूर, संजय चांडक, गोटू लाहोटी, बंडू हेडा तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, विणा लाहोटी, भारती राठी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.